1983 वर्ल्डकपमध्ये भारताचे दोन कॅप्टन, मोठा खुलासा
वर्ल्डकपच्या टीममधील प्रत्येक खेळाडूची भूमिका ही महत्त्वाची होती आणि त्यामागे एक खास किस्सा देखील होता.
मुंबई : 1983 वर्षाचा वर्ल्डकप प्रत्येक भारतीयाच्या लक्षात राहण्यासारखा आहे. ही आठवण पुन्हा एकदा ताजी होणार आहे ती 83 या सिनेमाच्या माध्यमातून. उद्या हा सिनेमा रिलीज होणार असून क्रिकेट फॅन्स याची आतुरतेने वाट पाहतायत. त्यावेळी वर्ल्डकपच्या टीममधील प्रत्येक खेळाडूची भूमिका ही महत्त्वाची होती आणि त्यामागे एक खास किस्सा देखील होता.
त्या वर्ल्डकपवेळी संदीप पाटील यांनी चांगला खेळ केला होता. सेमीफायनलमध्ये त्यांची धमाकेदार खेळीने टीमला फायनलपर्यंत पोहोचवलं होतं. त्यामुळे संदीप पाटील यांचा वर्ल्डकपमध्ये मोलाचा वाटा मानला जातो. दरम्यान नुकत्याच झालेल्या एका इंटरव्यूमध्ये 1983च्या वर्ल्डकपवेळी टीम इंडियाचे दोन कर्णधार असल्याचा खुलासा झाला.
या वर्ल्डकपमध्ये फलंदाजीशिवाय संदीप पाटील आणखी एका कारणासाठी प्रसिद्ध होते. टीममधील इतर सर्व खेळाडू त्यांना रात्रीचा कर्णधार मानत होते. इंटरव्यूमध्ये खेळाडू त्यांचे किस्से सांगताना ही गोष्ट समोर आली. कपिल देव हे त्यावेळी दिवसाचे कर्णधार होते आणि संदीप पाटील मैदानाबाहेरचे कर्णधार होते असा उल्लेख करण्यात आला.
'83' सिनेमात संदीप पाटील यांची भूमिका त्यांचा मुलगा चिराग पाटील साकारणार आहे. चिरागने सांगितलं की, त्याचे वडील संदीप जेव्हा क्रिकेट खेळायला जायचे तेव्हा त्यांची चाल वेगळी होती. त्याचबरोबर मैदानाबाहेर त्यांचा लूक अधिक स्टायलिश असायचा.
संदीप पाटील यांनी मात्र नेहमी या गोष्टीचा विरोध केला. संदीप म्हणाले की, मैदानाबाहेर आणि मैदानावर त्याची शैली नेहमीच सारखीच होती. दरम्यान 83 हा सिनेमा उद्या थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे.