हातात बिअरची बॉटल आणि पायाशी...; World Cup विजयानंतर मिशेल मार्शला ही कसली झिंग?
World Cup: मिचेल मार्शने काढलेल्या फोटोवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावेळी मिचेल मार्शने मद्यपान करत असताना वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय देत फोटोसाठी पोझ दिलीये.
World Cup: वर्ल्डकपच्या फायनल सामन्यामध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियांने भारताचा 6 विकेट्सने पराभव केला. या सामन्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ल्डकपची ट्रॉफी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंसकडे सोपवली. या ट्रॉफीसोबत ऑस्ट्रेलियाचे खेळाडू एन्जॉय करत होते. अशातच आता एक फोटो व्हायरल होत असून यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे.
मिचेल मार्शने वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर ठेवला पाय?
वर्ल्डकप जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाची टीम ट्रॉफी घेऊन ड्रेसिंग रूममध्ये गेली आणि फोटो शूट केली. यावेळी काही खेळाडूंनी फॅमिलीसोबत ट्ऱॉफी घेऊन फोटो काढले. मात्र यावेळी मिचेल मार्शने काढलेल्या फोटोवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावेळी मिचेल मार्शने मद्यपान करत असताना वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय देत फोटोसाठी पोझ दिलीये. या फोटोनंतर भारतीय चाहत्यांनी मात्र त्याला चांगलच धारेवर धरलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झाला फोटो
मिचेल मार्शचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. यावेळी काही युझर्सने कांगारू खेळाडूंना किंमत नसल्याचं म्हटलंय. दरम्यान यावरून आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. याशिवाय मिचेल मार्श यावर काय स्पष्टीकरण देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा पराभव
वर्ल्डकपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया टीमचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील केवळ 240 रन्स करू शकली. केएल राहुलने 107 बॉल्समध्ये 66 रन्सची खेळी तर विराट कोहलीने 54 रन्सची खेळी खेळली. कर्णधार रोहित शर्माचं या सामन्यात पुन्हा एकदा अर्धशतक हुकलं. रोहितने 31 बॉल्समध्ये 47 रन्स केले. ऑस्ट्रेलियन टीमकडून मिचेल स्टार्कने 3 विकेट्स घेतले. तर पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूडने प्रत्येकी 2-2 विकेट घेतले.
टीम इंडियाने दिलेल्या 241 रन्सचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया आक्रमक फलंदाजीच्या मुडमध्ये मैदानात उतरली होती. यावेळी रोहितने शमीला गोलंदाजी दिली आणि शमीने कांगारूंना पहिला धक्का दिला. त्यानंतर बुमराहने आक्रमक गोलंदाजीचं प्रदर्शन करत दोन विकेट्स काढल्या. टीम इंडियाला खरा धोका होता, तो ट्रेविस हेड याच्याकडून. ट्रेविस हेड आणि मार्नस लाबुशेन यांनी शतकीय भागेदारी केली अन् टीम इंडियाला बॅकफूटवर पाठवलं.