Cricket News : सध्या तिशी किंवा चाळीशीमध्ये असणाऱ्या अनेकांसाठीच काही क्रिकेटपटू हे जणू त्यांच्या बालपणीची आठवण. फक्त भारतीय संघातील क्रिकेटपटूच नव्हे, तर इतर देशातील क्रिकेटपटूंनीही कैक क्रिकेटप्रेमींच्या मनावर राज्य केलं. यातलंच एक नाव म्हणजे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर. सध्या हा खेळाडू क्रिकेटमध्ये सक्रिय नसला तरीही त्यानं गाजवलेला काळ मात्र कोणीही विसरू शकलेलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथं शोएब कॉमेंट्री किंवा प्री आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशन गाजवत असतानाच तिथं चर्चा सुरुय ती एका अशा खेळाडूची, ज्याच्या गोलंदाजीच्या शैलीनं सर्वांनाच 'रावळपिंडी एक्सप्रेस'ची आठवण झाली. कोण आहे हा खेळाडू, ज्याची इतकी चर्चा सुरुय माहितीये? 


सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक व्हिडीओंमधून सध्या हा एक व्हिडीओ अनेकदा पाहिला जात आहे. कारणही तसंच आहे. हा व्हिडीओ आहे ओमान डी10 लीग सामन्यांचा. जिथं आयएएस इन्विजिबल्स विरुद्ध याल्लाह शबाब जायंट्स यांचा सामना सुरू असतानाच एक क्षण असा आला की, पाहणारे बुचकळ्यात आले. x च्या माध्यमातून शेअर करण्यात आलेल्या या पोस्टमध्ये नेटकऱ्यानं असं काही साधर्म्य अधोरेखित केलं की पाहणारे हैराण झाले. 'हा खुद्द शोएब अख्तरपेक्षाही जरा जास्तच त्याच्यासारखा दिसतोय नाही...' असं कॅप्शन देत प्रशांत एस नावाच्या अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. 


बस्स... मग काय? नेटकऱ्यांच्या उत्साह आणि उत्सुकतेचा उधाण आलं, त्यांनी इमरान नावाच्या गोलंदाजाविषयी आणि त्याच्या या (Shoaib Akhtar) शोएब अख्तर स्टाईलविषयी खणून खणून माहिती मिळवण्यास सुरुवात केली. हा व्हिडीओ पाहताना या गोलंदाजाची धावण्याची पद्धत, त्याचे धावताना उडणारे केस पाहता एखाद्यामध्ये साधर्म्य किती असावं याचीच चर्चा सुरू झाली. 


हेसुद्धा वाचा : विजयानंतर विराट कोहलीने नागीन डान्स करून बांगलादेशला डिवचलं? IND vs BAN मॅच दरम्यानचा Video Viral


 


कोण आहे इमरान...?


शोएब अख्तरसारखीच गोलंदाजी करणाऱ्या इमरान नावाच्या या खेळाडूनं वयाच्या 18 व्या वर्षी पाकिस्तानच्या खैबर पख्तुन्वा येथील त्याचं गाव सोडलं. सध्या तो 30 वर्षांचा असून, पोटापाण्यासाठी मस्कतमध्ये सीसीटीव्ही दुरूस्ती आणि नव्यानं बसवण्याचं काम करतो. शिवाय तो ओमानमधील एका फ्रँचायझी लीग क्रिकेट संघातूनही खेळतो.



अनेकदा काही खेळाडू हे त्यांच्या आधीच्या पिढीकडून आदर्श घेत त्यांचं अनुकरण करताना किंवा त्यांच्या खेळाची शैली आत्मसात करताना दिसतात. इथं इमरान आणि शोएबच्या शैलीत बऱ्याच अंशी दिसणारं साधर्म्य पाहता आता हा योगायोग म्हणावा की आणखी काही.... कमेंटमध्ये तुम्हीच सांगा.