मुंबई : आयपीएलची जादू सध्या प्रत्येक क्रिकेट रसिकावर आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण क्रिकेटबद्दलच बोलत आहेत. रस्ता, गल्ली, समुद्र किनारा आणि मैदानामध्ये प्रत्येक जण क्रिकेट खेळताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकर रस्त्यावर मुलांसोबत क्रिकेट खेळला. सचिन तेंडुलकरचा हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला. यानंतर आता आणखी एका खेळाडूचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. ऑस्ट्रेलियाचा हा माजी क्रिकेटपटू साधूचा वेष परिधान करुन मैदानात गेला आणि मुलांसोबत क्रिकेट खेळला. मुलांनी ओळखू नये म्हणून त्यानं भगवी वस्त्र आणि खोटे केस लावले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा दिग्गज क्रिकेटपटू दुसरा तिसरा कोणी नसून ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट ली आहे. ब्रेट लीनं फक्त बॅटिंगचं नाही तर बॉलिंगही केली. साधूच्या वेषात आलेल्या ब्रेट लीला मुलांनीही ओळखलं नाही. साधूच्या वेषातल्या ब्रेट लीला पाहून मुलंही हैराण झाली होती.


ब्रेट लीनं त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये ७६ टेस्ट मॅच, २२१ वनडे आणि २५ टी-20 मॅच खेळल्या आहेत. १९९४मध्ये भारतात आलेला ब्रेट ली तेव्हा १८ वर्षांचा होता. ब्रेट लीला भारत आणि बॉलीवूडबाबत विशेष प्रेम आहे. ली हिंदी बोलायलाही शिकला आहे. २००६मध्ये ब्रेट लीनं आशा भोसलेंसोबत गाणंही म्हणलं होतं.



ब्रेट लीनं ७६ टेस्टमध्ये ३१० विकेट घेतल्या होत्या. तर २२१ वनडेमध्ये ३८० आणि २५ टी-20मध्ये २८ विकेट घेण्यात लीला यश आलं होतं. भारताविरुद्ध १२ टेस्टमध्ये लीनं ५३ विकेट घेतल्या. यामध्ये २ वेळा ५ विकेटचा समावेश आहे. ब्रेट लीनं भारताविरुद्ध ३२ वनडेमध्ये ५५ विकेट घेतल्या. वनडेमध्ये लीनं ४ वेळा ५ विकेट घेतल्या आहेत.