`विराट कोहलीने किती प्रयत्न केले तरी...,` सचिनचा उल्लेख करत लाराने दिलं आव्हान, म्हणाला `उगाच छातीठोकपणे...`
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा रेकॉर्ड मोडू शकेल का याबाबत आपल्याला साशंकता असल्याचं वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराने म्हटलं आहे. विराट कोहलीने नुकताच एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा रेकॉर्ड मोडला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने प्रयत्न केल्यास आणि मेहनत घेतल्यास काहीही अशक्य नाही हे दाखवून दिलं आहे. 2020 ते 2022 दरम्यान खडतर टप्पा आल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीका केली होती. पण विराट कोहलीने दमदार पुनरागमन करत सर्व टीकाकारांना उत्तर दिलं. वर्ल्डकपमध्ये तर विराट कोहलीने आपल्या नावे अनेक रेकॉर्ड्सची नोंद केली. भारताचा वर्ल्डकपमध्ये पराभव झाला असला, तरी विराटसाठी मात्र हा वर्ल्डकप इतर अनेक कारणांसाठी खास ठरला.
विराट कोहलीने वर्ल्डकपमध्येच आपला आदर्श असणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शतकांचा रेकॉर्ड मोडला. सेमी-फायनलमध्ये विराट कोहलीने न्यूझीलंडविरोधात 50 वं शतक ठोकलं आणि सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय क्रिकेटमधील शतकांचा रेकॉर्ड मोडीत काढला. तसंच एकाच वर्ल्डकपध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही मोडला. विराट कोहलीने 11 सामन्यात 765 धावा केल्या.
एखादा फलंदाज सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडेल असा कोणी विचारही केला नव्हता. पण विराट कोहलीने सचिनच्या तुलनेत 173 सामन्यांच्या अंतरानेच हा विक्रम गाठला. 35 वर्षीय विराट कोहलीने खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये एकूण 80 आंतरराष्ट्रीय शतके आणि 26,000 हून अधिक धावा केल्या आहेत. माजी कर्णधाराने खूप उंच आणि काही खालच्या गोष्टी पाहिल्या आहेत, परंतु तो नेहमीपेक्षा जास्त भुकेलेला दिसतो.
वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराने विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा रेकॉर्ड मोडणं सोपं जाणार नाही असं म्हटलं आहे. विराट कोहली आता तरुण राहिला नसून जसजसं वय वाढत जाईल तसं त्याच्यासमोर आव्हान निर्माण होईल असं लारा म्हणाला आहे.
"विराट कोहली आता 35 वर्षांचा झाला आहे. त्याच्या नावे 80 शतकं असून, अजून 20 ची गरज आहे. जर त्याने प्रत्येक वर्षी 5 शतकं ठोकली तरी त्याला सचिनच्या रेकॉर्डची बरोबरी करण्यासाठी 4 वर्षं लागतील. तोपर्यंत कोहली 39 वर्षांचा झाला असेल आणि समोर आव्हानं उभी असतील," असं लारा एबीपी माझाशी संवाद साधताना म्हणाला.
"कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. जे म्हणत आहेत की, कोहली 100 शतकांचा रेकॉर्ड मोडेल ते क्रिकेटमधील लॉजिकचा विचार करत नाहीत. 20 शतकं हा फार मोठा टप्पा आहे. काही फलंदाज संपूर्ण करिअरमध्ये इतकी शतकं करु शकत नाहीत. मी उगाच उत्साहात कोहली करु शकेल असं म्हणणार नाही. वय वाढणं कोणासाठीही थांबत नाही," असं ब्रायन लाराने सांगितलं.