Brij Bhushan Singh On Vinesh Phogat : भारताची कुस्तीपटू विनेश फोगट आणि ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया यांनी 5 सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हरियाणा विधानसभेच्या पाश्वभूमीवर दोघांनी आता राजकारणात एंट्री केली असून विनेश फोगटला काँग्रेसकडून विधानसभेचं तिकीट जाहीर झालं आहे. विनेश, बजरंगच्या काँग्रेस प्रवेशानंतर कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे नेते बृजभूषण सिंह यांनी विनेश फोगटवर निशाणा साधत मोठे वक्तव्य केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बृजभूषण सिंह यांनी म्हंटले की, "जवळपास दोन वर्षांपूर्वी या खेळाडूंनी 18 जानेवारी रोजी एक कट रचला. मी तेव्हाच म्हटलं होते की, हा एक राजकीय कट आहे. यात काँग्रेस सामील होती, दीपेंद्र हुड्डा सामील होते, भूपेंद्र हुड्डा सामील होते, पूर्ण पटकथा लिहिण्यात आली होती. ते खेळाडूंचं आंदोलन नव्हतंच आणि हे आता स्पष्ट झालं आहे की काँग्रेस या नाटकात सामील होती".  


बृजभूषण सिंह यांनी एएनआयशी बोलताना म्हटले की, "मी मुलींचा गुन्हेगार नाही, मुलींचा गुन्हेगार जर कोणी असेल तर ते बजरंग आणि विनेश आहे. या नाटकाची स्क्रिप्ट लिहिणारे भूपेंद्र हुड्डा जबाबदार आहेत. यांच्यामुळे जवळपास पावणे दोन वर्ष कुस्ती क्षेत्रातील घडामोडी ठप्प होत्या". कुस्तीपटू विनेशवर हल्लाबोल करताना बृजभूषण सिंह म्हणाले, "हे खरं नाहीये का की एशियन गेम्समध्ये विनेश ट्रायल शिवाय गेली होती, मी कुस्तीचे जाणकार आणि विनेशला विचारू इच्छितो की एक खेळाडू एका दिवसात दोन वजनी गटासाठी ट्रायल देऊ शकतो का? वजन केल्यावर पाच तास कुस्ती थांबवण्यात येऊ शकते का? तुम्ही नियमांबद्दल बोलता, मग एक खेळाडू एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या वजनी गटासाठी ट्रायल देतो यामुळे दुसऱ्या खेळाडूंचा हक्क मारला जात नाही का? पाच तास कुस्ती थांबवण्यात आली नव्हती का? रेल्वेच्या रेफरीनचा वापर झाला नाही का? तुम्ही कुस्ती जिंकून गेला नव्हता, तुम्ही चीटिंग करून गेला होता". 


भूपेंद्र हुड्डावर साधला निशाणा : 


भूपेंद्र हुड्डावर निशाणा साधत भाजप नेता बृजभूषण सिंह यांनी आरोप लावले की, "हरियाणा काँग्रेसचे नेता कुस्तीपटूंच्या आंदोलनामागे होते. हे काँग्रेसचे आंदोलन होते. या संपूर्ण आंदोलनात माझ्या विरुद्ध जो कट रचण्यात आला त्याचं नेतृत्व हे भूपेंद्र हुड्डा  यांनी केले होते. मी हरियाणाच्या लोकांना सांगू इच्छितो की भूपेंद्र हुड्डा, दीपेंद्र हुड्डा, बजरंग किंवा विनेश हे महिला कुस्तीपटूंच्या सन्मानासाठी आंदोलनाला नव्हते बसले. यांच्यामुळे हरियाणाच्या मुलींना लाज वाटतं आहे. यासाठी आम्ही जबाबदार नाही तर भूपेंद्र हुड्डा, दीपेंद्र हुड्डा आणि आंदोलन करणारे जबाबदार आहेत". 


विनेश फोगटचं पदक हुकलं : 


भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगट ही नुकतीच पॅरिस ऑलिम्पिक 2024मुळे चर्चेत आली होती. ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 50 किलो वजनी गटाची अंतिम फेरी गाठणाऱ्या विनेशला केवळ 100 ग्रॅम वजन जास्त असल्याने अपात्र ठरवण्यात आले होते. त्यानंतर तिला रौप्य पदक देण्याची याचिका सुद्धा क्रीडा लवादाने फेटाळली, त्यामुळे तिला रिकाम्या होतीच भारतात परतावे लागले. विनेश ही भारताची पहिली कुस्तीपटू आहे, जिने ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक दिली होती.   


विनेशने रेल्वेतील नोकरीचा दिला राजीनामा : 


कुस्तीपटू विनेश फोगट हिने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर रेल्वेतील सरकारी नोकरीचा त्याग केला. उत्तर रेल्वेमध्ये विनेश ही OSD च्या पदावर कार्यरत होती. या पदावर कार्यरत असताना विनेश फोगटला दरमहा 1 लाख रुपये पगार होता.