टीम इंडियाच्या कोचची निवड लांबणीवर
टीम इंडियाच्या कोचची निवड आणखी लांबवणीवर पडलीय. सल्लागार समितीनं कोच निवडीसाठी आणखी कालावधी मागितलाय.
मुंबई : टीम इंडियाच्या कोचची निवड आणखी लांबवणीवर पडलीय. सल्लागार समितीनं कोच निवडीसाठी आणखी कालावधी मागितलाय. विराट कोहलीशी चर्चा केल्यानंतर कोचच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. त्याचप्रमाणे कोहलीनं कोणाच्याही नावाची शिफारस केली नसल्याचं सौरव गांगुलीनं स्पष्ट केलं आहे.
नवा कोच हा 2019 च्या वर्ल्ड कपर्यंत असेल असंही सौरव गांगुली म्हणाला आहे. रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवाग, टॉम मूडी आणि लालचंद राजपूत कोचच्या रेसमध्ये आहेत. तर खरी चुरस ही रवी शास्त्री आणि सेहवागमध्ये आहे. कोहलीची पसंतची ही शास्त्रींना आहे. मात्र, सल्लागार समितीनं आणखी वेळ मागितल्यानं आता रवि शास्त्रींच्या नावावर शिक्कामोर्तब होणार की, एखादं नवं नाव पुढे येणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांची सल्लागार समिती नव्या कोचची निवड करणार आहे. टीम इंडियाचा कोचची निवड करण्यासाठी आज मुंबईमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला सौरव गांगुली आणि लक्ष्मण उपस्थित होते. या दोघांनी वीरेंद्र सेहवागची मुलाखतही घेतली.