सप्टेंबरच्या या ३ तारखा, जेव्हा पाकिस्तान भारतावर पडलं भारी
इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजनंतर भारतीय टीम आता आशिया कप वनडे स्पर्धा खेळण्यासाठी युएईला जाणार आहे.
मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजनंतर भारतीय टीम आता आशिया कप वनडे स्पर्धा खेळण्यासाठी युएईला जाणार आहे. या स्पर्धेची सुरुवात १५ सप्टेंबरपासून होणार आहे. श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये पहिली मॅच होणार आहे. या स्पर्धेमध्ये ६ देश सहभागी आहेत. भारताचा पहिला सामना १८ सप्टेंबरला हाँगकाँगविरुद्ध होईल. तर पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान १९ सप्टेंबरला भिडतील.
भारत-पाकिस्तानमध्ये १० दिवसांत ३ सामने
भारत आणि पाकिस्तान १० दिवसांमध्ये ३ मॅच खेळू शकतात. ग्रुप एमध्ये भारत, पाकिस्तान आणि हाँगकाँग एका ग्रुपमध्ये आहेत. या ग्रुपमध्ये जर मोठा उलटफेर झाला नाही तर पुढच्या राऊंडमध्ये भारत आणि पाकिस्तानची टीम प्रवेश करेल. असं झालं तर २३ सप्टेंबरला पुन्हा भारत-पाकिस्तानमध्ये मॅच होईल. या दोन्ही टीमला पुन्हा एकदा एकमेकांशी भिडण्याची संधी मिळेल. यासाठी दोन्ही टीमना फायनल गाठावी लागेल. २८ सप्टेंबरला फायनल खेळवण्यात येणार आहे.
या ३ तारखांना पाकिस्तान पडलं भारी
आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तानचा मुकाबला १९, २३ आणि २८ सप्टेंबरला होऊ शकतो. या ३ तारखांना ४ वेळा भारत-पाकिस्तान सामने झाले आहेत. या सगळ्या मॅचमध्ये पाकिस्ताननं भारताला हरवलं आहे. २३ सप्टेंबर १९९६ साली टोरंटोमध्ये पाकिस्तानचा ५२ रननी विजय झाला. २८ सप्टेंबर १९९७ साली पाकिस्ताननं भारताला ५ विकेटनं हरवलं. १९ सप्टेंबरला भारत-पाकिस्तान २ वेळा खेळले आहेत. १९९८ साली भारताचा १३४ रननी आणि २००४ साली ३ विकेटनी पराभव झाला होता.
भारत १२९ पैकी ५२ मॅच जिंकला
भारत आणि पाकिस्तानमध्ये आत्तापर्यंत १२९ वनडे मॅच झाल्या आहेत. यामध्ये भारतानं ५२ मॅच जिंकल्या तर ७३ मॅचमध्ये पराभव झाला. ४ मॅचचा कोणताही निर्णय लागला नाही.
भारत ६ वेळा जिंकला आशिया कप
आशिया कपमध्ये भारताचं शानदार रेकॉर्ड आहे. आत्तापर्यंत १३ पैकी ६ वेळा भारतानं आशिया कप जिंकला आहे. श्रीलंकेनं ५ वेळा आणि पाकिस्ताननं २ वेळा आशिया कप जिंकला. भारतीय टीमनं मागच्यावेळी २०१६ साली आशिया कप जिंकला होता. पाकिस्ताननं याआधी २०१२ साली आशिया कपवर नाव कोरलं होतं.