टेस्ट टीममध्ये कर्णधार अजिंक्य रहाणेचं स्थान धोक्यात!
न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणारी दोन सामन्यांची कसोटी मालिका अजिंक्य रहाणेसाठी शेवटची संधी ठरू शकते.
मुंबई : भारताचा कसोटी फलंदाज अजिंक्य रहाणे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फीट होत नसल्याच्या चर्चा आहेत. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अजिंक्य रहाणेच्या खराब कामगिरीमुळे भारताची फलंदाजी अनेक प्रसंगी फ्लॉप ठरली. 25 नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणारी दोन सामन्यांची कसोटी मालिका अजिंक्य रहाणेसाठी शेवटची संधी ठरू शकते.
जर न्यूझीलंड या मालिकेत अजिंक्य रहाणे फ्लॉप राहिला, तर त्याच्या कसोटी उपकर्णधारासोबत त्यालाही संघातून बाहेर केलं जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत रहाणेला कसोटी संघात पाचव्या क्रमांकावर स्थान मिळवून देणारे 3 फलंदाज आहेत.
1. श्रेयस अय्यर
न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रेयस अय्यरचा प्रथमच कसोटी संघात समावेश करण्यात आलाय. रहाणेची बॅट गेल्या अनेक मालिकांमध्ये फारशी चांगली कामगिरी करू शकली नाही. त्यामुळेच श्रेयस अय्यरला कसोटी संघात रहाणेच्या स्थानाचा दावेदार बनवण्याच्या दिशेने निवड समितीने पाऊल उचललं आहे.
अय्यर जवळपास तीन वर्षांपासून वनडे आणि टी-20 संघाचा भाग आहे. पण पहिल्यांदाच त्याला कसोटी संघात स्थान देण्यात आलंय. अय्यर मधल्या फळीत फलंदाजी करू शकतो. त्यामुळेच नवीन मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली निवड समितीने अय्यरला टेस्ट क्रिकेटमध्ये समाविष्ट केलं आहे.
2. मयंक अग्रवाल
अजिंक्य रहाणेच्या जागी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मयांक अग्रवाल मोठा दावेदार मानला जात आहे. मयंक अग्रवालला अखेरची ब्रिस्बेन कसोटीत खेळण्याची संधी मिळाली. मयंक अग्रवाल इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटी मालिकेतही खेळला नव्हता. मयंक अग्रवालच्या नावावर कसोटीत 1000 हून अधिक धावा आहेत आणि त्याची सरासरीही 45.73 आहे.
मयंक अग्रवालने आतापर्यंत भारतासाठी 14 कसोटी सामन्यांमध्ये 46 च्या सरासरीने 1052 धावा केल्या आहेत. त्याने 23 डावांत तीन शतकं आणि चार अर्धशतकं झळकावली आहेत.
3. हनुमा विहारी
हनुमा विहारीच्या रेकॉर्डवर नजर टाकली तर तो अजिंक्य रहाणेच्या जागी पाचव्या क्रमांकाचा प्रबळ दावेदार मानला जातो. टीम इंडियाचा विश्वासार्ह फलंदाज हनुमा विहारी हा अनेकदा संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये असतो. टीम इंडिया अजिंक्य रहाणेच्या जागी हनुमा विहारीला पाचव्या क्रमांकावर संधी देऊ शकते. 27 वर्षीय हनुमा विहारीने 12 कसोटी सामन्यात 32.84 च्या सरासरीने 624 धावा केल्या आहेत.