मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2023 सीझन सुरु होण्यासाठी अजून बराच काळ बाकी. काही दिवसांपूर्वी एक बातमी समोर आली होती की, पंजाब किंग्स त्यांचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्याशी संबंध तोडून नवीन प्रशिक्षकाची नियुक्ती करू शकते. मात्र ही अफवा असल्याचं स्पष्ट झालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर आता अजून एक बाब समोर आली ती म्हणजे, पंजाब किंग्स त्यांचा कर्णधार मयंक अग्रवाललाही हटवण्याच्या तयारीत आहे. दरम्यान यानंतर आता पंजाब किंग्सने स्वतः अधिकृत निवेदन जारी केलं आहे.


पंजाब किंग्जने याबाबत स्पष्टता दिली आहे की, ज्या काही बातम्या सुरू आहेत, त्या सर्व निराधार आहेत. टीमची अधिकृत भूमिका अगदी स्पष्ट आहे आणि ती आपल्या खेळाडूंसोबत आहे.


पंजाब किंग्सने आपल्या निवेदनात लिहिलंय की, “पंजाब किंग्जच्या कर्णधारपदाबाबत एका क्रीडा वेबसाइटने बातमी प्रसिद्ध केली आहे. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की पंजाब किंग्जच्या कोणत्याही सदस्याने असं विधान केलेलं नाही."



आयपीएल 2022 च्या आधी झालेल्या मेगा लिलावात पंजाब किंग्जने त्यांचा संपूर्ण संघ बदलला होता. टीमने मयंक अग्रवालला कायम ठेवलं आणि त्याला कर्णधार म्हणून नियुक्त केलं. मात्र इतके बदल करूनही पंजाब किंग्जला यावेळीही प्लेऑफमध्ये मजल मारता आली नाही. कर्णधार म्हणून मयंक अग्रवालची कामगिरीही फारशी चांगली नाही.


मयंक अग्रवालच्या आधी टीमची कमान केएल राहुलकडे होती. त्याने आयपीएल 2022 पूर्वी टीम सोडण्याचा निर्णय घेतला आणि लखनऊ सुपर जायंट्समध्ये सामील झाला. लखनऊने पहिल्याच सत्रात आश्चर्यकारक कामगिरी केली आणि प्लेऑफमध्ये स्थान पटकावलं. मात्र ते विजेतेपद मिळवू शकले नाही.