Wrestlers Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे (Wrestling Federation of India) अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीगिरांना (Wrestlers) केंद्र सरकारने चर्चेसाठी निमंत्रण दिलं आहे. बृजभूषण सिंह यांनी महिला कुस्तीगिरांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप असून त्यांना अटक केली जावी अशी कुस्तीगिरांची मागणी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जंतर मंतरवर सुरु असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर हे आंदोलन चिघळलं होतं. यानंतर आता केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यांना चर्चेसाठी बोलावलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुस्तीगिरांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांची भेट घेतली होती. यानंतर लगेचच केंद्राने कुस्तीगिरांना चर्चेसाठी बोलावलं आहे. अनुराग ठाकूर यांनी ट्वीट करत सांगितलं आहे की "सरकार कुस्तीगिरांशी त्यांच्या मुद्द्यांवर चर्चा करु इच्छित आहे. मी पुन्हा एकदा कुस्तीगिरांना चर्चेसाठी बोलावत आहे".


शनिवारी रात्री कुस्तीगिरांनी रात्री उशिरा अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया याने सरकारने आम्हाला बैठकीबद्दल बाहेर बोलू नका असं सांगितलं असल्याची माहिती दिली. बजरंग पुनियाने यावेळी गृहमंत्र्यांशी कोणतीही संगनमत झाल्याचा दावा नाकारला. अमित शाह यांनी त्यांना चौकशी सुरू असल्याची माहिती दिली असल्याचं त्याने सांगितलं. 



"आमचं आंदोलन अद्याप संपलेलं नसून, पुढेही सुरु राहणार आहे. हे आंदोलन पुढे कसं न्यायचं यासंबंधी धोरण आम्ही आखत आहोत," असं बजरंग पुनियाने सांगितलं आहे. सरकारने दिलेल्या प्रतिक्रियेवर आम्ही खेळाडू समाधानी नाही. सरकार आमच्या मागण्याही मान्य करत नाही आहे असंही बजरंग पुनियाने सांगितलं. 


सूत्रांच्या माहितीनुसार, अमित शाह यांनी शनिवारी रात्री 11 वाजता बजरंग पुनिया, साक्षी मलिक, संगीता फोगाट, सत्यवर्त कादियन यांची भेट घेतली होती. जवळपास 1 तास त्यांची बैठक सुरु होती.  


एका अल्पवयीनासह सात महिला कुस्तीपटूंनी ब्रृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. कुस्तीगीर संघटनेच्या प्रमुखावर नि:पक्षपातीपणे चौकशी करून त्वरीत कारवाई करण्याची मागणी कुस्तीगिरांनी केली आहे. दिल्ली पोलिसांनी ब्रृजभूषण सिंह यांच्याविरोधातील लैंगिक छळाच्या आरोपांसंदर्भात अनेकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, महासंघाच्या तीन ते चार सदस्यांची चौकशी करण्यात आली आहे. तसंच सिंह यांच्या दिल्लीतील निवासस्थानावरील काही कर्मचाऱ्यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे.


भारतीय किसान युनियनचे (Bhartiya Kisan Union ) नेते राकेश टिकैत यांनी मंगळवारी सांगितलं की, शेतकरी संघटनेने कुस्तीपटूंना दिलेला पाठिंबा मागे घेतलेला नाही आणि कुस्तीपटूंच्या विनंतीनुसार सिंह यांच्या विरोधात 9 जून रोजी पुकारलेलं आंदोलन पुढे ढकलललं आहे.