नवी दिल्ली : २०१८ हे वर्ष भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली याच्यासाठी शानदार ठरलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रन्सचा डोंगर आणि शतकांचा रेकॉर्ड मोडणाऱ्या विराटसमोर २०१९ मध्ये नवी आव्हानं असणार आहेत. जगभरातील सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून विराट कोहलीचं नाव आज पहिल्या स्थानावर आहे. एक फलंदाज म्हणून नाही तर एक कर्णधार म्हणून देखील त्याला या वर्षात अग्नीपरीक्षा द्यावी लागणार आहे. त्याची श्रेष्ठता दाखवण्याची त्याचाकडे ही मोठी संधी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१९ मध्ये विराट कोहलीला वनडे वर्ल्डकप खेळायचा आहे. देशभरातील क्रिकेट चाहत्यांना त्याच्याकडून अपेक्षा आहेत. कोहलीची कर्णधार म्हणून ही अग्नीपरीक्षा असणार आहे. २०१९ चा वर्ल्डकप कोहलीसाठी पुढचा मार्ग दाखवेल. या वर्ल्डकपमध्ये विराटकडे कपिल देव आणि महेंद्र सिंह धोनीच्या क्लबमध्ये सहभागी होण्याची संधी आहे.


१९८३ मध्ये कपिल देव आणि २८ वर्षानंतर २०११ मध्ये धोनीने भारतासाठी वर्ल्डकप जिंकला होता. ८ वर्षानंतर आता कोहलीकडे देखील संधी आहे. २००८ मध्ये अंडर-१९ टीमला वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या कोहलीपुढे पुन्हा एकदा तिच संधी असणार आहे. विराटच्या करिअरमधला हा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट आहे. 


३० मे ते १४ जुलै दरम्याने इंग्लंडमध्ये वर्ल्डकप होणार आहे. या दरम्यान तेथे उन्हाळा असेल. त्यामुळे भारतासाठी मात्र हा प्लस पॉईंट असेल. विराट ब्रिगेडकडे ही मोठी संधी असेल. सध्या भारतीय टीममध्ये संतुलन आणि फॉर्म दोन्ही आहे. या वर्ल्डकपमध्ये भारतासमोर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांचं मोठं आव्हान असेल. आता विराट कोहली टीमला घेऊन कशाप्रकारे रणनीती आखतो आणि भारताला पुन्हा एकदा वर्ल्डकप जिंकवून देतो हे पहावं लागेल.