...म्हणून माही अचानक फॉर्ममध्ये आला, धोनीच्या सध्याच्या यशाचं रहस्य
२०१९ सालच्या वर्ल्ड कपआधी धोनीच्या फॉर्ममध्ये येण्यामुळे भारतीय टीमची चिंता दूर झाली आहे.
मुंबई : २०१९ सालच्या वर्ल्ड कपआधी धोनीच्या फॉर्ममध्ये येण्यामुळे भारतीय टीमची चिंता दूर झाली आहे. २०१८ साली खराब कामगिरी केलेल्या धोनी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यामध्ये अचानक फॉर्ममध्ये आला. धोनीच्या या फॉर्ममध्ये येणाच्या रहस्याचा उलगडा आता झाला आहे. धोनीनं त्याच्या बॅटमध्ये काही बदल केल्याची माहिती समोर आली आहे.
२०१८ साली धोनीनं १३ वनडे इनिंगमध्ये २५ च्या सरासरीनं २७५ रन केल्या होत्या. १२ वर्षांच्या कारकिर्दीमधली धोनीची ही सगळ्यात वाईट कामगिरी होती. धोनीच्या या खराब कामगिरीमुळे ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांच्या नावाची वर्ल्ड कपसाठी चर्चाही सुरु झाली होती. पण २०१९च्या सुरुवातीलाच धोनीनं जोरदार पुनरागमन केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिन्ही वनडेमध्ये धोनीनं अर्धशतकं झळकावली. या सीरिजमध्ये धोनीची सरासरी तब्बल १९३ एवढी होती. या कामगिरीमुळे त्याला मॅन ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं. धोनीच्या या कामगिरीमुळे भारतानं ऑस्ट्रेलियाला वनडे सीरिजमध्ये पराभूत केलं.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजनंतर न्यूझीलंडमधल्या पहिल्या वनडेमध्येही धोनीनं नाबाद ४८ रनची खेळी केली. या वर्षात धोनीनं ६ वनडे इनिंगमध्ये १२१ च्या सरासरीनं २४२ रन केल्या आहेत. तर ३ टी-२० मॅचमध्ये धोनीला ३०.५० च्या सरासरीनं ६१ रन करता आल्या.
धोनीच्या एका जवळच्या माणसानं एका इंग्रजी वृत्तपत्राला धोनीनं बदललेल्या बॅटबद्दल माहिती दिली. 'धोनीनं त्याची जमेची बाजू असलेल्या गोष्टी लक्षात घेऊन आणि बॉलर त्याला जिकडे लक्ष्य करतायत ते पाहून काही बदल केले,' असं धोनीच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं.
स्पार्टनची बॅट वापरणाऱ्या धोनीनं २०१८ साली झालेल्या आशिया कपपासूनच बॅटमध्ये बदल केले. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजपासून धोनीच्या या बॅटमधून रन यायला सुरुवात झाली.
'धोनीनं त्याच्या बॅटच्या खालच्या आणि मागच्या भागात जास्त लाकूड वापरायला सुरुवात केली. याआधी त्याच्या बॅटच्या मध्यभागात जास्त लाकूड असायचं. बॅटच्या खालच्या भागात जास्त लाकूड असल्यामुळे धोनीच्या शॉटमध्ये आणखी ताकद आली. बॉलर जेव्हा तुमच्याविरुद्ध एखादी योजना आखतो आणि यशस्वी होतो, तेव्हा तुम्हाला दुसरी योजना आखावी लागते,' असं धोनीच्या जवळची व्यक्ती म्हणाली. धोनीच्या बॅटचं वजन हे अंदाजे १,१५० ग्रॅमच्या आसपास आहे.
भारत दौऱ्यामध्ये ऑस्ट्रेलिया २ टी-२० मॅच आणि ५ वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे. या सीरिजमध्येही धोनीनं अशाच प्रकारची कामगिरी करावी, अशी त्याची आणि भारतीय टीमची इच्छा असेल. वर्ल्ड कपआधीची भारताची ही शेवटची सीरिज आहे. यानंतर भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये व्यस्त असतील. आयपीएलनंतर लगेचच इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप होणार आहे. ३० मेपासून वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.