आयपीएल फायनल : चेन्नईनं टॉस जिंकला
आयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नईनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : आयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नईनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ही मॅच होत आहे. २ महिने आणि ५९ मॅचनंतर आता आज आयपीएलच्या यंदाच्या वर्षातल्या दोन सर्वोत्तम टीम एकमेकांना भिडणार आहेत. धोनीच्या चेन्नईचा सामना केन विलियमसनच्या हैदराबादशी होणार आहे. आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबादची टीम पहिल्या आणि चेन्नईची टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर यावर्षी या दोन्ही टीम ३ वेळा एकमेकांसमोर आल्या होत्या. या तिन्ही वेळा चेन्नईनं हैदराबादचा पराभव केला होता. या मॅचमध्ये चेन्नईनं हरभजन सिंगऐवजी करण शर्माला संधी दिली आहे. तर हैदराबादनं टीममध्ये दोन बदल केले आहेत. ऋद्धीमान सहाऐवजी श्रीवत्स गोस्वामी आणि खलीलऐवजी संदीप शर्माला टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे.
चेन्नईची टीम
शेन वॉटसन, फॅप डुप्लेसिस, सुरेश रैना, अंबती रायडू, एम.एस.धोनी, ड्वॅन ब्राव्हो, रवींद्र जडेजा, दीपक चहर, करण शर्मा, शार्दुल ठाकूर, लुंगी एनगिडी
हैदराबादची टीम
शिखर धवन, श्रीवत्स गोस्वामी, केन विलियमसन, शकीब अल हसन, दीपक हुडा, युसुफ पठाण, कारलोस ब्रॅथवेट, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, संदीप शर्मा
चेन्नईचा अंबाती रायडू या आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तर कर्णधार महेंद्रसिंग धोनीनंही त्याच्या वादळी खेळीची चुणूक अनेक सामन्यांमध्ये दाखवली आहे. चेन्नईचा ओपनर शेन वॉटसननंही यावर्षी एक शतक झळकवलं आहे. तर हैदराबादविरुद्धच्याच प्ले ऑफ मॅचमध्ये फॅप डुप्लेसिसनं चेन्नईला एक हाती मॅच जिंकवून दिली. या मॅचमध्ये चेन्नईची बॅटिंग तर हैदराबादची बॉलिंग मजबूत आहे. हैदराबादकडे भुवनेश्वर कुमार, राशिद खान आणि सिद्धार्थ कौल हे बॉलर आहेत. राशिद खाननं कोलकात्याविरुद्धच्या एलिमिनेटरमध्ये अष्टपैलू कामगिरी करत हैदराबादला फायनलमध्ये पोहोचवलं होतं. हैदराबादच्या बॅटिंगची मदार कर्णधार केन विलियमसन आणि शिखर धवनवर असणार आहे.
याआधी चेन्नईनं २०१० आणि २०११ अशी दोन वेळा आयपीएल जिंकली होती. तर हैदराबादला २००९ आणि २०१६ साली आयपीएल जिंकता आली. पण २००९ साली हैदराबादच्या टीमचं नाव आणि मालक वेगळे होते. त्यामुळे यावर्षी विजय होणारी टीम ३ वेळा आयपीएल जिंकण्याच्या रेकॉर्डशी बरोबरी करेल. ३ आयपीएल जिंकण्याचं रेकॉर्ड सध्या मुंबईच्या नावावर आहे. मुंबईनं २०१३, २०१५ आणि २०१७ साली आयपीएल जिंकली होती.