आयपीएल लिलावात कोणीच विकत न घेतलेला पुजारा खेळणार या लीगमधून
आयपीएल लिलावामध्ये चेतेश्वर पुजाराला कोणत्याच टीमनं विकत घेतलं नाही.
मुंबई : आयपीएल लिलावामध्ये चेतेश्वर पुजाराला कोणत्याच टीमनं विकत घेतलं नाही. त्यामुळे आता पुजारा इंग्लंडची काऊंटी क्लब टीम यॉर्कशायरकडून खेळणार आहे. यॉर्कशायरकडून खेळण्यासाठी पुजारानं करारही केला आहे. २९ वर्षांचा पुजारा दुसऱ्यांदा यॉर्कशायरकडून काऊंटी क्रिकेट खेळणार आहे. याआधी २०१५ साली पुजारा यॉर्कशायरकडून खेळला होता. याचवर्षी यॉर्कशायरची टीम काऊंटी स्पर्धा जिंकली होती.
न्यूझीलंडचा कॅप्टन केन विलीयमसनसोबत पुजारा हा दुसरा परदेशी खेळाडू ७ एप्रिलपासून यॉर्कशायर टीमशी जोडला जाईल. काऊंटी क्रिकेट खेळल्यानंतर लगेचच भारताचा इंग्लंड दौरा आहे. त्यामुळे पुजाराला नक्कीच फायदा होईल. भारताचा इंग्लंड दौरा संपल्यावरही यॉर्कशायरकडून खेळू शकतो. कारण यॉर्कशायरचा शेवटचा घरचा सामना १८ सप्टेंबरला आहे. यानंतर २४ सप्टेंबरला यॉर्कशायर वोर्सेस्टरशरविरुद्ध खेळेल.
यॉर्कशायरकडून पुन्हा एकदा खेळायची संधी मिळाल्यामुळे मी आनंदी आहे. सचिन तेंडुलकर, युवराज सिंगसारख्या खेळाडूंनी यॉर्कशायरचं प्रतिनिधीत्व केलं, अशा टीमकडून खेळणं हा माझ्यासाठी सन्मान आहे, असं पुजारा म्हणालाय. आयसीसी टेस्ट क्रमवारीतले टॉप ६ खेळाडू आता यॉर्कशायरकडे आहेत. जो रुट(तिसरा), केन विलियमसन(चौथा) आणि पुजारा (सहावा) हे खेळाडू यॉर्कशायरकडून खेळतील.