कुस्तीपटू हत्या प्रकरणी आरोपी सुशील कुमारसह साथीदाराला बेड्या
दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या मारहाण आणि कुस्तीपटू हत्या प्रकरणी फरार आरोपी ऑलिम्पिक मेडलिस्ट सुशील कुमारला अटक करण्यात आली आहे.
मुंबई: दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या मारहाण आणि कुस्तीपटू हत्या प्रकरणी फरार आरोपी ऑलिम्पिक मेडलिस्ट सुशील कुमारला अटक करण्यात आली आहे. सुशील कुमारसह त्याच्या साथीदाराच्या मुस्क्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे.
स्पेशल सेलचे स्पेशल सीपी नीरज ठाकूर यांनी सांगितले की, कुस्तीपटू सुशील कुमारला स्पेशल सेलच्या टीमने अटक केली आहे. दिल्लीच्या मुंडका परिसरातून अटक करण्यात आलं. सुशील कुमारला रोहिणी कोर्टात हजर केलं जाणार आहे. तिथून सुशील आणि त्याचा साथीदार अजयला उत्तर-पश्चिम जिल्हा पोलिसांच्या स्वाधीन केलं जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
छत्रसाल स्टेडियमवर माजी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूच्या हत्येमध्ये सुशीलचा हात असल्याचा आरोप आहे. मागील काही दिवसांपासून तो फरार होता. दिल्लीच्या कोर्टाने अलीकडेच त्याला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे. सुशीलने मंगळवारी रोहिणी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, तो कोर्टाने फेटाळला.
सुशील कुमार फरार असून त्याची माहिती देणाऱ्यावर दिल्ली पोलिसांनी 1 लाख रुपयांचा इनाम देणार असल्याची घोषणा केली होती. 4 मे रोजी कुस्तीपटू सागर धनखड याच्यासोबत छात्रसाल स्टेडियममध्ये सुशील कुमारचा वाद झाला. दोन गटांच्या वादातून सागर धनखडची हत्या करण्यात आली. त्यानंतर सुशील कुमार घटनास्थळावरून फरार झाला होता.