कोरोना व्हायरसमुळे शोएब अख्तर चीनवर भडकला
कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि आर्थिक हानी झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाला जागतिक साथ म्हणून घोषित केली आहे. पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर कोरोनावरुन चीनवर चांगलाच संतापला आहे.
शोएब अख्तरने त्याच्या युट्यूब अकाऊंटवरुन चीनच्या खाण्याच्या पद्धतीवर टीका केली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शोएबने वादग्रस्त व्हिडिओ एडिट केला. सोबतच शोएबने उर्दू भाषेत एक ट्विट केलं. 'संपूर्ण जग आणि माणुसकीसाठी हा कठीण काळ आहे. अफवा पसरवू नका, सावध व्हा', असं शोएब त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला.
'चीनी लोकांच्या खाण्याच्या पद्धतीमुळे हा धोकादायक आजार पसरला आहे. यामुळे संपूर्ण जगालाच धोका निर्माण झाला आहे. जगात खाण्या-पिण्यासाठी एवढ्या गोष्टी आहेत, तरीही चीनी लोकं वटवाघूळ, कुत्रे आणि मांजरी कसे खाऊ शकतात? हे प्राणी खायची गरज काय? खाण्याच्या या पद्धतीमुळे जगाचं नुकसान होत आहे. अल्लाहने खाण्यासाठी अनेक हलाल जनावरं बनवली आहेत, मग तुम्हाला हे सगळं खाण्याची गरज काय?' असे प्रश्न शोएबने उपस्थित केले.
'चीनी लोकांच्या खाण्यावर मला आक्षेप नाही. पण वटवाघूळ, कुत्रे आणि मांजरी खायची गरज काय? ते या प्राण्यांचं रक्त खातात आणि युरीन पितात, त्यामुळे कोरोना जगभर पसरला आहे. संपूर्ण जग संकटात आहे. तुमच्या खाण्या-पिण्यामुळे कोणालाच फायदा होत नाहीये, हे चीनने लक्षात घेतलं पाहिजे. भारत आणि बांगलादेशसारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशात कोरोनामुळे नुकसान होऊ नये, ही माझी प्रार्थना आहे,' असं वक्तव्य शोएबने केलं.
'कोरोना व्हायरसमुळे सगळे खेळ आणि खेळाच्या आयोजनावर परिणाम झाला. पाकिस्तानमध्ये अनेक वर्षांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं पुनरागमन झालं आहे. पहिल्यांदाच संपूर्ण पीएसएल पाकिस्तानमध्ये खेळवली जात आहे. आता या व्हायरसचा पीएसएलवरही परिणाम झाला आहे. पीएसएल रद्द झाली नसली तरी ही स्पर्धा प्रेक्षकांशिवाय खेळवली जात आहे. परदेशी खेळाडूही त्यांच्या मायदेशी परतत आहेत. आयपीएल आणि भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजही थांबवण्यात आली आहे. खेळाची जोडल्या गेलेल्यांचं यामुळे नुकसान होत आहे,' अशी प्रतिक्रिया शोएबने दिली.