या क्रिकेटरमुळे गेलने ठोकले शतक
आयपीएलमध्ये पुन्हा एकदा प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या तोंडात क्रिस गेलचे नाव आहे.
मोहाली : आयपीएलमध्ये पुन्हा एकदा प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या तोंडात क्रिस गेलचे नाव आहे. आपल्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर गेलने आयपीएलच्या या सीझनमध्ये केवळ दोन सामने खेळतानाच धुमाकूळ घातलाय. शुक्रवारी गेलने हैदराबादविरुद्ध जोरदार शतक ठोकताना अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले. गेलने ६३ चेंडूत एक चौकार आणि ११ षटकार खेचत १०४ धावांची दमदार खेळी केली.
त्याच्या तडाखेबंद खेळीमुळे पंजाबला हैदराबादविरुद्ध विजय साकारता आला. गुरुवारी हैदराबादविरुद्ध पंजाबने गेलच्या शतकामुळे १९३ धावा केल्या होत्या. आयपीएलच्या इतिहासातील गेलचे हे सहावे शतक आहे. गेलने सामन्यातील १४व्या ओव्हरमध्ये रशिद खानच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये सलग चार षटकार खेचले.
गेलचे अर्धशतक होईपर्यंत तो शांतपणे खेळत होते. स्वत: कमेंटेटरही गेलची ही संथ खेळी पाहून आश्चर्यचकित झाले होते. गेलने ३९ चेंडूत ५० धावा केल्या होत्या. हे त्याचे आयपीएलमधील सलग दुसरे अर्धशतक होते.
रशिदमुळे गेलला आला राग आणि...
याआधी रशिद खान संघाची आठवी आणि आपली दुसरी ओव्हर खेळत होता. त्यावेळी ओव्हरमधील दुसरा बॉल त्याने क्रिस गेलकडे टाकला. गुड लेंथच्या या बॉलवर गेलने सरळ शॉट खेळला. बॉल रशीद खानच्या हाती गेला. गेलने क्रीज धावण्यासाठी सरसावला मात्र लगेच मागे सरकला. रशिदने बॉल सरळ स्टंपवर मारला. गेलने पुढच्या चेंडूत एक धाव घेतली. याच ओव्हरमध्ये रशीद खानने लोकेश राहुलला बाद केले.
रशीद खानच्या नावावर हा वाईट रेकॉर्ड
रशीद खानने १४व्या ओव्हरमध्ये पुन्हा गोलंदाजी केली. यावेळी गेलने त्याच्यावर चांगलाच अॅटॅक केला. ओव्हरमधील पहिला चेंडू नायरने खेळला. नायरने एक धाव घेतली आणि स्ट्राईक गेलकडे आला. त्यावेळी गेलच्या खात्यात ४० चेंडूत ५१ धावा होत्या. त्यानंतर गेलने रशिद खानच्या प्रत्येक चेंडूवर आक्रमण सुरु केले. रशिदच्या एका ओव्हरमध्ये गेलने २७ धावा काढल्या. एकाच ओव्हरमध्ये गेलने चार षटकार ठोकले. टी-२०मधील रशीदचा हा सर्वात महागडा स्पेल ठरला.