Venkatesh Prasad Blasts Indian Team: वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेमधील पाचव्या सामन्यामध्ये यजमान संघाने भारताला 8 विकेट्स आणि 2 ओव्हर राखून पराभूत केलं. या पराभवाबरोबरच भारताने टी-20 मालिका 2-3 च्या फरकाने गमावली. टी-20 मधील पराभवानंतर भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादने पुन्हा एकदा भारतीय संघावर हल्लाबोल केला आहे. प्रसादने ट्वीटर (एक्सवरुन) भारतीय संघाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे. भारताच्या या माजी दिग्गज क्रिकेटपटूने सध्याच्या संघातील खेळाडूंना आपलं कौशल्यामध्ये सुधारणा करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच प्रसादने कर्णधार हार्दिक पंड्यावर निशाणा साधत त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.


प्रसाद संतापला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर प्रसादने ट्वीटरवरुन, "भारताला आपल्या कौशल्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. त्यांच्यामध्ये जिंकण्याची भूक आणि जिंकण्यासंदर्भातील तीव्रता फार कमी आहे. अनेकदा कर्णधारच गोंधळलेला वाटतो. गोलंदाज हा फलंदाजी नाही करु शकतं. फलंदाज गोलंदाजी नाही करु शकतं. तुम्ही तुमच्या होकाराला होकार देणाऱ्या लोकांचा शोध घेऊ नये किंवा एखादा खेळाडू आपला आवडता आहे याचा विचारही करु नये. जास्तीत जास्त आणि व्यापक स्वरुपातून चांगलं ते स्वीकारावं," असा सल्ला दिला आहे. 



धोनीचा केला उल्लेख


या ट्वीटनंतर प्रसादने एका चहात्याच्या ट्वीटर हॅण्डलवरही प्रतिक्रिया नोंदवली आहे. भारतीय कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाबद्दल तुमचं म्हणणं काय आहे असं या चाहत्याने विचारलं होतं. या प्रश्नाला उत्तर देताना प्रसादने, "ते या पराभवासाठी जबाबदार आहेत. त्यांनी याची जबाबदारी स्वीकारावी. हल्ली प्रक्रिया (प्रोसेस) वगैरे सारख्या शब्दांचा चुकीच्या अर्थाने वापर केला जातो. एम. एस. धोनी खऱ्या अर्थाने हे शब्द वापरायचा. आताचे खेळाडू केवळ वापरायचा म्हणून तो वापरतात. खेळाडूंची निवड करताना कोणतंही सातत्य दिसत नाही. काहीही निवड आणि निर्णयांचं प्रमाण वाढलं आहे," असं म्हटलं आहे. 


नक्की वाचा >> 'पराभव अनेकदा चांगला असतो'; मालिका गमावल्यावर हार्दिकचं अजब विधान! म्हणाला, 'आम्हाला फार...'


पराभवानंतर हार्दिक पंड्याने एखाद्या मालिकेत पराभव झाला तरी हरकत नाही मात्र काय शिकलो हे आणि संपूर्ण प्रोसेस महत्त्वाची आहे असं म्हटलं होतं. त्यावरुनच प्रसादने हा टोला लगावला.



आपण भ्रमात...


निर्णायक सामन्यामध्ये भारताचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. वेस्ट इंडीजने 2017 नंतर पहिल्यांदाच भारताविरुद्धची टी-20 मालिका जिंकली आहे. अंतिम सामन्यामध्ये वेस्ट इंडीजचा ब्रॅण्डन किंग हाच स्टार ठरला. त्याने नाबाद 85 धावांची खेळी करताना 5 चौकार आणि 6 षटकार लगावले. टी-20 मध्ये त्याचा हा सर्वोत्तम वैयक्तिक स्कोअर आहे. वेस्ट इंडीजच्या यापूर्वीच्या कामगिरीचा संदर्भ देत प्रसादने भारतीय संघाच्या सुमार कामगिरीवर टीकास्त्र सोडलं आहे. "केवळ 50 षटकांचा वर्ल्डकपच नाही तर टी-20 वर्ल्डकपसाठी वेस्ट इंडीजचा संघ अपात्र ठरला आहे. भारत अशा संघाविरोधात भारताने सुमार कामगिरी करणे आणि त्याचा बचाव करणे हे फारच त्रासदायक आहे. विजयाची भूक आणि आग या खेळाडूंमध्ये दिसत नाही. आपण भ्रमात राहत आहोत," असंही प्रसादने म्हटलं आहे.



भारतीय संघ या मालिकेमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजासारखे वरिष्ठ खेळाडूंशिवाय खेळला. अनेक तरुण खेळाडूंना या मालिकेत संधी देण्यात आली.