मुंबई : आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. पहिला सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता होता. या सामन्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीनं कर्णधारपद सोडलं असून ती धुरा रवींद्र जडेजाच्या खांद्यावर दिली. त्यानंतर जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईला पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अचानक आलेलं नेतृत्व आणि पिच यामुळे जडेजाला सामना जिंकण्यात अडचणी आल्या. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई संघाला 4 वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकण्यात यश आलं. चेन्नई संघाचे कोच स्टीफन प्लेमिंग यांनी धोनीनं कर्णधारपद का सोडलं याबाबत मोठी माहिती दिली आहे. 


कोचचं धोनीच्या निर्णयावर मोठं वक्तव्य
चेन्नईचे हेड कोच स्टीफन यांनी धोनीनं कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर मोठं वक्तव्य केलं. 'धोनीनं हा निर्णय अचानक घेतला नाही. तो गेल्यावर्षी आयपीएलच्या 14 व्या हंगामात याबाबत विचार करत होता. त्यावर चर्चाही झाली होती. त्याने कर्णधारपद कधी सोडावं याबाबतच्या वेळेचा निर्णय त्याच्यावर सोडण्यात आला होता.' 


'गेल्यावर्षी आयपीएल दरम्यान धोनीने कर्णधारपद सोडण्याबाबत माझ्यासोबत चर्चा केली होती. कोणत्या वेळी सोडायचं हा निर्णय धोनीचा होता. ते त्याच्यावर सोडण्यात आलं होतं. त्यामुळे धोनीनं अचानक कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला असं म्हणता येणार नाही' असंही स्टीफन यावेळी म्हणाले. 


'धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर संघाची कमान जडेजाकडे असेल हे खूप आधीपासून ठरलं होतं. याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. श्रीनिवासन यांच्या मते त्यावेळी त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं. त्यांच्या म्हणण्यानुसार ही बदलाची वेळ आहे. त्यामुळे नवा कर्णधार असेल आणि जुन्या कर्णधाराचा अनुभवही गाठीशी असेल.'


महेंद्रसिंह धोनीनं 12 वर्ष चेन्नईच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जडेजाकडे ती सोपवण्यात आली. धोनीने 213 सामन्यामध्ये संघाचं नेतृत्व केलं. चेन्नई संघाला धोनीनं 4 वेळा आयपीएलची ट्रॉफी मिळवून दिली आहे.