`पाकिस्तानात ये उपचार करतो`; आफ्रिदी-गंभीरमध्ये वादावादी सुरूच
शाहिद आफ्रिदी आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये सुरू असलेली वादावादी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये.
मुंबई : शाहिद आफ्रिदी आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये सुरू असलेली वादावादी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. गौतम गंभीरने केलेल्या टीकेला आता आफ्रिदीने पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिलं आहे. आत्मचरित्रातल्या संदर्भावरून गंभीरने आफ्रिदीवर टीका केली होती. 'शाहिद आफ्रिदी ३९ वर्षाचा असला तरी त्याची बुद्धी १६ वर्षांच्या मुलासारखी आहे. भारत अजूनही पाकिस्तानी नागरिकांना मेडिकल व्हिसा देत आहे. मी स्वत: शाहिद आफ्रिदीला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जाईन, असं गंभीर म्हणाला होता'.
'माझी रेकॉर्ड सगळ्यांना माहिती आहेत. मला आयसीसी टेस्ट प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला, टेस्ट सीरिज आणि वर्ल्ड कप जिंकलो, पण काही माणसं मानसिकदृष्ट्या आजारी असतात, त्यांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज असते. मी देशासाठी काय केलं हे नागरिकच ठरवतील. पण यामुळे आफ्रिदीचं आत्मचरित्र चांगलं खपेल', अशी प्रतिक्रिया गंभीरने दिली होती. गंभीरच्या या टीकेला आफ्रिदीने प्रत्युत्तर दिलं आहे.
'गौतम गंभीरलाच उपचारांची गरज आहे. गंभीरने पाकिस्तानमध्ये यावं. मी पाकिस्तानातल्या काही चांगल्या रुग्णालयांसोबत काम करत आहे. या रुग्णालयामध्ये गंभीरवर उपचार होऊ शकतात. त्याला व्हिसा मिळत नसेल, तर पटकन व्हिसा मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करतो' असं आफ्रिदी म्हणाला आहे.
आत्मचरित्रावरून वाद
शाहिद आफ्रिदीने त्याचं आत्मचरित्र 'गेमचेंजर'मध्ये गौतम गंभीरवर सडकून टीका केली आहे. 'मला गौतम गंभीर आवडत नाही कारण तो अजिबात सकारात्मक नाही. गंभीर स्वत:ला डॉन ब्रॅडमन आणि जेम्स बॉण्ड असल्याचं समजतो. मला आनंदी आणि सकारात्मक लोकं आवडतात. ते आक्रमक आणि स्पर्धात्मक असले तरी चालेल, पण गंभीर तसा नाही. गौतम गंभीरकडे व्यक्तीमत्वही नाही आणि त्याची क्रिकेटमध्ये किर्तीही नाही. गौतम गंभीरचं क्रिकेटमध्ये मोठं रेकॉर्ड नाही, पण त्याला प्रचंड गर्व आहे', असं आफ्रिदीने त्याच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे.
२००७ साली कानपूरमध्ये गंभीर आणि आफ्रिदीमध्ये मैदानात राडा झाला होता. याबद्दलही आफ्रिदीने आत्मचरित्रात भाष्य केलं आहे. 'कानपूरमधल्या त्या वनडेमध्ये एक रन काढताना गंभीर माझ्या अंगावर आला. आम्ही एकमेकांच्या महिला नातेवाईकांबद्दल बोललो. अंपायर इयन गुल्ड या प्रकारात मध्ये पडले आणि हे प्रकरण थांबवलं, पण अंपायर मध्ये पडले नसते, तर मीच माझ्या पद्धतीने हे प्रकरण संपवलं असतं', असंही आफ्रिदी आत्मचरित्रात म्हणाला आहे. या प्रकारानंतर आफ्रिदीला ९५ टक्के आणि गंभीरला ६५ टक्के दंड आकारण्यात आला होता.
गौतम गंभीर हा भाजपच्या तिकीटावर दिल्ली पूर्व मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे.