बर्मिंघम : जगभरात सध्या कॉमनवेल्थ गेम्सचा धुमाकुळ सुरु आहे. अनेक देशातील खेळाडू पदकं जिंकून आपआपल्या देशाचे नाव उंचावत आहे. त्यामुळे या खेळाडूंच्या कामगिरीची चर्चा सुरु असताना गुरूवारी एक वेगळीच घटना घडली. लाईव्ह मॅचमध्ये खेळाडू भिडल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॉमनवेल्थ गेम्समध्ये गुरुवारी इंग्लंड आणि कॅनडा संघात सामना रंगला होता. हा सामना हॉकीचा होता, मात्र प्रेक्षकांना त्यात कुस्ती पाहायला मिळाली. कारण या खेळाच्या लाईव्ह सामन्या दरम्यान इंग्लंड आणि कॅनडाचे खेळाडू एकमेकांशी भिडल्याची घटना घडली. ही घटना इतकी वाढली की नंतर रेफ्रींना (पंचांना) येऊन हस्तक्षेप करावा लागला.


उपांत्य फेरी गाठण्यासाठी इंग्लंडला 15 गोल्सची आवश्यकता होती. 15 पेक्षा कमी गोल्स झाल्यास उपांत्य फेरीचं स्वप्न भंगणार होतं. त्यामुळे इंग्लंड संघाचे खेळाडू कॅनडाविरुद्ध गोल करण्यासाठी सतत आक्रमक खेळ दाखवत होते.


दरम्यान लाईव्ह सामन्यात बलराज पानेसरची हॉकी स्टिक इंग्लंडच्या ख्रिस ग्रिफिथच्या हाताला लागली आणि ती अडकली. यामुळे संतापलेल्या ग्रिफिथने पानेसरला धक्काबुक्की केली. त्यामुळे संतप्त झालेल्या पानेसरने इंग्लंडच्या खेळाडूची मान पकडली. मग दोघांनी एकमेकांचे टी-शर्ट पकडून ओढायला सुरुवात केली. त्यामुळे काही क्षणासाठी हॉकीचे मैदान कुस्तीचे मैदान वाटत होते. 



पंचांचा हस्तक्षेप 
बलराज पानेसर आणि ग्रिफिथ यांच्यात इतकी भयानक लढत झाली, की ते पाहून प्रेक्षकांचा डोळ्यांवर विश्वास बसला नाही. नंतर पंचांना हस्तक्षेप करावा लागला. यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू आले आणि दोघांना वेगळे केले. यानंतर रेफ्रींनी कॅनडाच्या बलराज पानेसरला रेड कार्ड दाखवून सामन्यातून बाहेर पाठवले. त्याचवेळी इंग्लंडच्या ख्रिस ग्रिफिथला यलो कार्ड दाखवून इशारा देण्यात आला.


कॅनडाला एका खेळाडूचे नुकसान सहन करावे लागले. याची किंमत त्याला सामना गमावून चुकवावी लागली. इंग्लंडने हा सामना 11-2 ने जिंकला, पण तरीही संघ उपांत्य फेरी गाठू शकला नाही.