Babar Azam vs Shaheen Afridi: यंदाचा टी-20 वर्ल्डकप अमेरिकेत खेळवला जातोय. यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा खेळ काही फारसा चांगला झालेला नाही. पहिल्यांदा अमेरिकेने आणि त्यानंतर टीम इंडियाने ए ग्रुपमध्ये पाकिस्तानच्या टीमचा पराभव केला आहे. या पराभवानंतर पाकिस्तानच्या टीमला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या टीममध्ये सध्या काही आलबेल नसल्याची माहिती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने मोठा खुलासा केला आहे. बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी एकमेकांशी बोलत नसल्याचं वसीम अक्रमने म्हटलं आहे. त्यामुळे दोघांमध्येही वादाची ठिणगी अजूनही धुमसताना दिसतेय.


टीमसाठी हे योग्य नाही- वसीम अक्रम


बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदीच्या मुद्द्यावर वसीम अक्रम म्हणाला की, गेल्या महिन्यात कर्णधार बदलल्यापासून ते एकमेकांशी बोलत नाहीत. मुळात ही परिस्थिती टीमसाठी अजिबात योग्य नाही. वर्ल्डकप सारख्या स्पर्धेत सर्वांनी एकजुटीने खेळले पाहिजे. हे खेळाडू 10 वर्षांपासून क्रिकेट खेळत आहेत, मी त्यांना शिकवू शकत नाही. तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहात आणि तुम्ही स्वतःसाठी खेळताय. याला काही अर्थ नाहीये, अशा खेळाडूंना घरी बसवा


अक्रम पुढे म्हणाला, मोहम्मद रिझवानला खेळाची जाणीव नाही. जसप्रीत बुमराहला विकेट घेण्यासाठी बॉल देण्यात आला आहे हे त्याला कळायला हवं होतं. तो चेंडूवर नियंत्रण ठेवत खेळला असता, पण मोहम्मद रिझवानने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो पॅव्हेलियनमध्ये परतला.


वसीम अक्रमने मोहम्मद रिझवान आणि इफ्तिखार अहमद यांच्या खराब फलंदाजीवर जोरदार टीका केली. इथे महत्त्वाचा सामना सुरू आहे आणि इफ्तिखार अहमदला फलंदाजी कशी करावी हे माहित नाही? इफ्तिखार अहमदला लेग साइडवर एकच शॉट कसा खेळायचा हे माहीत आहे का? असा सवाल वसीम अक्रमने विचारला आहे. गेल्या 10 वर्षापासून तो पाकिस्तान संघाकडून खेळतोय. मात्र, त्याला शॉर्टस कसे खेळायचे? याची माहिती नाहीये का? असं म्हणत वसीम अक्रमने खणखणीत टीका केली.


भारताकडून पाकिस्तानचा पराभव


भारताविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेला भारतीय संघ 19 ओव्हर्समध्ये 119 रन्सवर ऑलआऊट झाला. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानला 120 रन्सची गरज होती. पण पाकिस्तान टीमला 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट गमावत केवळ 113 रन्स करता आल्या. मात्र भारतीय गोलंदांजांपुढे पाकिस्तानी फलंदाज टिकू शकले नाहीत. अखेरीस टीम इंडियाचा 6 रन्सने विजय झाला.