आऊटनंतर रोहित शर्माला दिलं नॉट आऊट, मग झाला वाद
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ९ विकेट्सनं विजय झाला.
सेंच्युरिअन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ९ विकेट्सनं विजय झाला. या मॅचमध्ये रोहित शर्माच्या रुपात भारतानं एकमेव विकेट गमावली. एक जीवनदान मिळाल्यानंतरही रोहित या संधीचं सोनं करु शकला नाही. पण रोहितला मिळालेल्या जीवनदानावरुन वाद निर्माण झाला होता.
दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर कागिसो रबाडा पहिली ओव्हर टाकत होता. या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर कॅचसाठी रबाडासोबतच दक्षिण आफ्रिकेच्या टीमनं जोरदार अपील केलं. या अपीलनंतर अंपायरन रोहितला आऊट दिलं. पण रोहितनं रिव्ह्यूसाठी अपील केलं.
रोहितनं रिव्ह्यू घेतल्यानंतर थर्ड अंपायरनं रिप्ले बघायला सुरुवात केली. रिप्ले बघताना जेव्हा बॉल बॅटजवळून गेला तेव्हाच बॅट पॅडला लागल्याचा आवाजही झाला. स्निकोमीटरवरूनही गोष्ट स्पष्ट होत नसल्यामुळे थर्ड अंपायरनं संशयाचा फायदा रोहित शर्माला दिला आणि रोहितला नॉट आऊट देण्यात आलं. पण थर्ड अंपायरच्या या निर्णयामुळे वाद निर्माण झाला. जीवनदान मिळालं तेव्हा रोहित शर्मा ७ रन्सवर खेळत होता. पण यानंतरही रोहितला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. रोहित शर्मा १५ रन्सवर आऊट झाला.