Corona : कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तानी क्रिकेटपटूचं निधन
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे.
पेशावर : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्येही कोरोना व्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जफर सरफराज यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिओ टीव्हीने रुग्णालयातल्या सूत्रांच्या आधारे दिलेल्या वृत्तानुसार सरफराज यांनी सोमवारी रात्री लेडी रीडिंग रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
५० वर्षांचे सरफराज हे कोरोनामुळे मृत्यू होणारे पाकिस्तानचे पहिले व्यावसायिक क्रिकेटपटू आहेत. मागच्या मंगळवारी सरफराज यांची कोरोनो टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. मागच्या ३ दिवसांपासून ते व्हॅन्टिलेटरवर होते. सरफराज १९८८ ते १९९४ दरम्यान प्रथम श्रेणी क्रिकेट आणि १९९० ते १९९२ मध्ये लिस्ट-ए क्रिकेट (मर्यादित ओव्हर) खेळले. सरफराज यांनी पेशावरसाठी १५ प्रथम श्रेणी मॅचमध्ये ६१६ रन केले. २००० सालाच्या मध्यात ते पेशावरच्या वरिष्ठ टीमचे आणि अंडर-१९ टीमचे प्रशिक्षकही होते.
कोरोनामुळे काहीच दिवसांपूर्वी पाकिस्तानचे बुद्धीबळपटू आझम खान यांचा वयाच्या ९५व्या वर्षी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. पाकिस्तानमध्ये आत्तापर्यंत कोरोनामुळे १०० जणांचा मृत्यू झाला आहे.