मुंबई : भारतामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८०० पर्यंत पोहोचली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण १५३ रुग्ण झाले आहेत. एका दिवसात राज्यात रुग्णांची संख्या २८नी वाढली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचा सामना करण्यासाठी अनेक क्रिकेटपटू पुढे येत आहेत. या क्रिकेटपटूंनी नागरिकांना घरात राहण्याचं आवाहन केलं आहे, याचसोबत त्यांनी आर्थिक मदतही केली आहे. पण जागतिक खेळाडूंनी केलेली मदत पाहता भारतीय क्रिकेटपटूंचा हात आखडता असल्याचं म्हणावं लागेल.


मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कोरोनाशी लढण्यासाठी ५० लाख रुपयांची मदत केली आहे. सचिनने महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लाख रुपये आणि पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी २५ लाख रुपये दान केले आहेत.


बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने गरजूंसाठी ५० लाख रुपयांचा तांदूळ देण्याची घोषणा केली आहे. तर एमएस धोनीने १ लाख रुपयांची मदत केली आहे. धोनीने केलेल्या या मदतीवरुन त्याच्यावर सोशल मीडियावरुन निशाणा साधण्यात येत आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. या दोघांनी कोरोनाग्रस्तांसाठी केलेलं दान गुप्त ठेवल्याचं सांगण्यात येत आहे. शिखर धवन यानेही सोशल मीडियावरुन मदत करण्याचा सल्ला दिला, पण धवनने किती मदत केली हे समजू शकलेलं नाही.


इरफान पठाण आणि युसूफ पठाण या दोन्ही भावांनी कोरोनाशी सामना करण्यासाठी ४ हजार मास्क मोफत वाटली आहेत.  भारतीय क्रिकेटपटूंप्रमाणेच जगातले स्टार खेळाडूही त्यांच्या देशात मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.


दिग्गज फूटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने ८.२८ कोटी रुपये दान केले आहेत. स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडररने ७.७७ कोटी रुपये, लियोनेल मेसीने ८.२८ कोटी रुपये दान केले आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून जेवण आणि साबण यांच्यासारख्या आवश्यक वस्तू गरजूंना दिल्या आहेत.