मुंबई : देशभरामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भारतामध्ये कोरोनाचे रुग्ण ८००च्या वर गेले आहेत, तर १७ जणांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण १५३ रुग्ण झाले आहेत. एका दिवसात राज्यात रुग्णांची संख्या २८नी वाढली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या या संकटाचा सामना करण्यासाठी सेलिब्रिटी पुढे सरसावल्या आहेत. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी आर्थिक मदत दिली आहे. भारताचा क्रिकेटपटू एमएस धोनीने कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी १ लाख रुपयांची मदत केल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. धोनीने केलेल्या या मदतीवरून त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात आली. पण आता धोनीची पत्नी साक्षीने या सगळ्याबाबत मौन सोडलं आहे. 


साक्षी धोनीने मदतीचं हे वृत्त फेटाळून लावलं आहे. तसंच या कठीण काळामध्ये खोट्या बातम्या पसरवू नका, असंही साक्षी धोनी म्हणाली आहे. 'या संवेदनशील काळात खोट्या बातम्या देऊ नका, ही माझी विनंती आहे. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. जबाबदार पत्रकारिता कुठे गेली आहे,' असं ट्विट साक्षीने केलं आहे.



धोनीने पुण्याच्या मुकूल माधव फाऊंडेशनला १ लाख रुपयांची मदत केली. ही रक्कम पुढचे १४ दिवस १०० गरजू कुटुंबाना मदत म्हणून वापरली जाईल, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं साक्षी धोनीने स्पष्ट केलं आहे. 


कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा केली. पंतप्रधानांच्या घोषणेआधीच आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. पण कोरोनाचं हे संकट बघता यंदाच्या वर्षीचं आयपीएल रद्द होण्याची शक्यता जास्त आहे. २९ मार्चपासून यंदाच्या आयपीएलला सुरुवात होणार होती. २०१९ वर्ल्ड कपनंतर क्रिकेटपासून लांब असलेला धोनी आयपीएलमधून मैदानात पुनरागमन करणार होता. पण कोरोनामुळे धोनीचं पुनरागमन लांबणीवर पडलं आहे.