मुंबई : कोरोना व्हायरसने भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्येही थैमान घातलं आहे. कोरोनाचा सामना करताना निधी उभारण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात ३ वनडे मॅचची सीरिज खेळवा. या मॅचमध्ये मिळालेला पैसा कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी वापरा, असा प्रस्ताव पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने ठेवला होता. भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी भारताला पैशाची गरज नसल्याचं म्हणत शोएब अख्तरवर निशाणाा साधला होता. आता शोएब अख्तरने कपिल देव यांना प्रत्युत्तर दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मला काय बोलायचं आहे, ते कदाचित कपिल देव यांना समजलं नसेल. प्रत्येक जण आर्थिक अडचणीत येणार आहे. एकत्र येऊन पैसे गोळा करण्याची हीच संधी आहे. मी मोठ्या दृष्टीकोनातून बोलत आहे. भारत-पाकिस्तान मॅचमधून मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतील. कपिल देव म्हणाले पैशांची गरज नाही. त्यांना पैशांची गरज नसली तरी इतरांना आहे,' असं शोएब अख्तर म्हणाला.


'पाकिस्तानचे सध्याचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यापेक्षा मला भारत जास्त कळतो. भारतामध्ये मी खूप प्रवास केला आहे, आणि भारतीयांशी संवादही साधला आहे. पाकिस्तानमध्येही मी लोकांना भारतीयांबद्दल सांगत असतो. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये गरिबी आहे. माणूस म्हणून जेवढी मदत करणं शक्य आहे, तेवढी करणं माझी जबाबदारी आहे,' अशी प्रतिक्रिया शोएबने दिली.


'पाकिस्ताननंतर मला सर्वाधिक प्रेम भारतातून मिळालं आहे. भारतातून मिळालेल्या प्रेमाबद्दल मी कायम तुमचा ऋणी राहिन. हिमाचल प्रदेशपासून केरळपर्यंत ते उत्तराखंडपर्यंत मी भारताचा कानाकोपरा फिरलो आहे. पुढचे ६ महिने काहीच झालं नाही तर, आपल्यापुढे कोणते पर्याय उपलब्ध आहेत? क्रिकेटमुळे ज्यांना काम मिळतं त्यांचं काय? क्रिकेटवर ज्यांचं आयुष्य अवलंबून आहे त्यांचं काय करायचं`? पैसे कसे कमवायचे याची योजना आखण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल. भारत-पाकिस्तान मॅचमुळे फक्त निधीच गोळा होणार नाही, तर दोन्ही देशांमधले नातेसंबंधही सुधारतील,' असं मत शोएबने मांडलं.