मुंबई : जगभरामध्ये कोरोना व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि आर्थिक हानी झाली आहे. कोरोनामुळे संपूर्ण जगच जवळपास ठप्प झालं आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोनामुळे जगातली सगळ्यात मोठी क्रिकेट लीग असलेली आयपीएलही पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनाचं हे संकट बघता आयपीएल स्पर्धा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना व्हायरसमुळे सतत क्रिकेट खेळत असलेल्या टीम इंडियाला मोठा ब्रेक मिळाला आहे. टीम इंडियाने शेवटची मॅच न्यूझीलंडमध्ये खेळली होती. किवींविरुद्धच्या या टेस्ट मॅचमध्ये भारताचा पराभव झाला होता. २ मार्चला संपलेल्या या मॅचनंतर १४ मार्चला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १४ मार्चला धर्मशालामध्ये पहिली वनडे मॅच होती, पण ही मॅच पावसामुळे रद्द करण्यात आली. यानंतर कोरोनाचा कहर वाढल्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिकेची वनडे सीरिज रद्द करण्यात आली. 


२ मार्चला मैदानात उतरल्यानंतर भारतीय खेळाडू अजून एकही मॅच खेळलेले नाहीत. आयपीएलचं भवितव्य अंधारात असल्यामुळे निदान पुढचे काही दिवस टीम इंडिया मैदानात दिसणं मुश्किल आहे. टीम इंडिया वेळापत्रकानुसार आयपीएलनंतर आशिया कप खेळणं अपेक्षित होतं. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या या आशिया कपमध्ये खेळण्यास बीसीसीआयने नकार दिला. त्यामुळे युएईमध्ये आशिया कप खेळवला जाणार आहे. असं असलं तरी आशिया कपचं वेळापत्रक अजून समोर आलेलं नाही. 


टीम इंडियाच्या या वर्षीच्या कार्यक्रमावर नजर टाकली तर आतापर्यंत त्यांचा जवळपास १ महिन्याचा ब्रेक झालेला आहे. आयपीएल रद्द झाली तर निदान मे अखेरपर्यंत भारतीय खेळाडू मैदानात दिसणार नाहीत. म्हणजेच टीम इंडियाच्या खेळाडूंना निदान ३ महिन्यांची विश्रांती मिळेल.


याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंना मोठा ब्रेक २००७ साली मिळाला होता. १७ फेब्रुवारी २००७ साली श्रीलंकेच्या भारत दौऱ्यातली शेवटची मॅच झाली होती. या मॅचनंतर भारतीय टीम वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिजला रवाना झाली होती. १७ फेब्रुवारीनंतर १७ मार्चला टीम इंडिया वर्ल्ड कपची पहिली मॅच खेळली. पण वर्ल्ड कपची मॅच व्हायच्याआधी वेस्ट इंडिजमध्ये भारतीय टीम सराव सामने खेळली होती.


२००७ वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीम ग्रुप स्टेजमध्येच स्पर्धेबाहेर पडली. २३ मार्च २००७ साली भारतीय टीमने श्रीलंकेविरुद्ध वर्ल्ड कपचा शेवटचा सामना खेळला. यानंतर भारतीय टीम बांगलादेशच्या दौऱ्यावर गेली. १० मे २००७ साली भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिली वनडे मॅच झाली. वर्ल्ड कपमधून लवकर बाहेर पडल्यामुळे टीम इंडियाला दीड महिन्यांची विश्रांती मिळाली होती. यानंतर मात्र खेळाडूंना एवढी मोठी विश्रांती मिळायची ही पहिलीच वेळ आहे.