Indian Cricket : स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या पाच दिग्ज क्रिकेटपटूंनी रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) संपल्यानतंर क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. या क्रिकेटपटूंमध्ये बंगालचा दिग्गज फलंदाज मनोज तिवारी (Manoj Tiwari), झारखंडचा फलंदाज सौरभ तिवारी(Sourabh Tiwari), वेगवान गोलंदाज वरुण अॅरोन (Varun Aaron), मुंबईचा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी (Dhawal Kulkarni) आणि विदर्भाचा रणजी ट्रॉफी विजेता कर्णधार फैज फजल (Faiz Faizal) यांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंनी क्रिकेटमधून निवृत्तीची वेगवेगळी कारणं सांगितली आहेत. टीम इंडिया आणि आयपीएलमध्येही या खेळाडूंना फारशी संधी मिळाली नाही. यातले काही खेळाडू राजकारणात प्रवेश करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनोज तिवारीचं स्थानिक क्रिकेटमध्ये मोठं योगदान
वरुण अॅरोन, मनोज तिवारी आणि फैज फैजल यानी ज्या मैदानावरुन क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती, त्याच मैदनावरुन क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. स्थानिक क्रिकेटमध्ये संघांना त्यांची कमी जाणवणार आहे. बंगालच्या मनोज तिवारीने बिहारविरुद्ध संघाला विजय मिळवून देत अलविदा केलं. 38 वर्षीय मनोज तिवारी तब्बल 19 वर्ष बंगालसाठी खेळला. गेल्या हंगामात मनोज तिवारीच्या नेतृत्वात बंगलाने रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मनोज तिवारीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 10000 हून अधिक धावा केल्या आहेत. 


आक्रमक फलंदाज सौरभ तिवारी आणि वेगवान गोलंदाज वरुण अॅरोन यांच्या निवृत्तीने झारखंड संघालाही मोटा धक्का बसला आहे. 


सौरभ-वरुणाला संधीच मिळाली नाही
सौरव तिवारी गेली 17 वर्ष झारखंड संघासाठी खेळत आहे. त्याने 115 प्रथम श्रेणी सामन्यात 8030 धावा केल्या आहेत. यात 22 शतकं आणि 34 अर्धशतकांचा समावेश आहे. राष्ट्रीय संघात किंवा आयपीएलमध्ये संधी मिळत नसेल तर युवा क्रिकेटपटूंसाठी  राज्य संघातील जागा सोडण्याची हीच योग्य वेळ असल्याचं सौरभ तिवारी याने म्हटलं आहे. 


सौरभ तिवारीप्रमाणचे वरुण अॅरोनलाही भारतीय क्रिकेट संघात फारशी संधी मिळाली नाही. सातत्याने दुखापतीमुळे वरुण संघातून बाहेर राहिला. वरुण अॅरोनने प्रथम श्रेणी क्रिकेटच्या 66 सामन्यात 173 विकेट घेतल्या आहेत. 


फैज फजलला केवळ एका वन डेत संधी
फैज फजल तब्बल 21 वर्ष विदर्भ संघाकडून खेळला. त्याच्या नेतृत्वात विदर्भने 2018 मध्ये रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. त्या हंगामात फैज फजलनने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फैज फजलने 9183 धावा केल्या आहेत. फजलने टीम इंडियासाठी 2016 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण  केलं. या सामन्यात त्याने नाबाद 55 धावा केल्या. पण यानंतर त्याला संधी देण्यात आली नाही.


धवल कुलकर्णीचीही निवृत्ती
मुंबईचा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीनीही क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. स्विग, लाईन आणि लेंथसाठी धवल कुलकर्णी ओळखला जात होता. हमकास विकेट घेणारा गोलंदाज अशी त्याची ख्याती होती. धवल कुलकर्णी तब्बल 17 वर्ष मुंबई क्रिकेट संघासाठी खेळला. 35 वर्षीय धवलने 95 प्रथम श्रेणी सामन्यात 281 विकेट घेतल्या आहेत.