Team India T20 Series : टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर (Team India West Indies Tour) आहे. येत्या 12 जुलैपासून भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान पहिल्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल. या दौऱ्यात टीम इंडिया 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी20 सामने खेळणार आहे. कसोटी आणि एकदिवसीय संघाची घोषणा आधीच करण्यात आली होती. आता टी20 संघांचीही घोषणा करण्यात आली  आहे. या संघातून रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीसह (Virat Kohli) 6 वरिष्ठ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर संजू सॅमसनचं (Sanju Samson) पुनरागमन झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे आयपीएलमध्ये धावांचा डोंगर रचणाऱ्या रिंकू सिंहला (Rinku Singh) टी20 संघात स्थान देण्यात आलेलं नाही. यामुळे क्रिकेट प्रेमींनी निवड समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. रिंकू सिंहने आयपीएलच्या सोळाव्या हंगामात 149.53 च्या स्ट्राईक रेटने 474 धावा केल्या. गुजरातविरुद्धच्या सामन्यात त्याने विजय खेचून आणला होता. हा सामना क्रिकेटप्रेमी आजही विसरले नसतील. गुजरातचा वेगवान गोलंदाज यश दयालच्या शेवटच्या षटकात रिंकू सिंहने सलग पाच षटकार ठोकत कोलकाता नाईट रायडर्सला सामना जिंकून दिला होता. 


स्थानिक क्रिकेटमध्येही रिंकूने दमदार कामगिरी केली आहे. रिंकूने 41 सामन्यात तब्बल 2919 केल्या आहेत. यात 7 शतकं आणि 19 अर्धशतकं ठोकली आहेत. यानंतरही रिंकू सिंहकडे निवड समितीने दुर्लक्ष केल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. 


रिंकू सिंह प्रमाणेच सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाड यालाही निवड समितीने डावललं आहे. आयपीएल 2023 मध्ये गायकवाडने 590 धावा केल्या होत्या. चेन्नई सुपर किंग्सला पाचव्यांदा चॅम्पियन बनवण्यात ऋतुराज गायकवाडचं मोठं योगदान होतं. रिंकू आणि ऋतुराजप्रमाणेच राहुल तेवतिया आणि वेगवाग गोलंदाज आकाश मधवाल यांचाही विचार करण्यात आलेला नाही. 


रोहित-विराटची टी20 कारकिर्द संपली?
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली 2022 मध्ये झालेल्या टी20 विश्वचषकात खेळले होते. त्यानंतर दोघांना एका आंतरराष्ट्रीय टी20 मालिकेत घेण्यात आलेलं नाही. त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या टी20 कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. 


भुवनेश्वर-शमीवरही प्रश्नचिन्ह
दुसरीकडे वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणइ मोहम्मद शमी यांच्याबाबतही बीसीसीआयने काहीही स्पष्ट केलेलं नाही. टी20 सीरिजसाठी सर्व नव्या गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. 


भारतीय टी20 संघ
ईशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सैमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार