उस्मान ख्वाजाने बुटांवर हे काय लिहिलं? क्रिकेट विश्वात खळबळ... आयसीसी कारवाई करणार?
Australia vs Pakistan Test Series : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान दरम्यानच्या कसोटी सामन्याआधी क्रिकेट विश्वात एक खळबळ उडाली आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज उस्मान ख्वाजाने आपल्या बुटांवर एक संदेश लिहिला असून यामुळे आयसीसी त्याच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे.
Australia vs Pakistan Test Series : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान क्रिकेट संघांदरम्यान 14 डिसेंबरपासून पहिल्या कसोटी सामन्याला (Test Match) सुरुवात होणार आहे. दोन्ही संघात तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार असून पहिला सामना ऑस्ट्रेलियातल्या पर्थमध्ये रंगणार आहे. पण या सामन्यापूर्वीच एक नवा वाद निर्माण झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने (Usman Khwaja) सरावादरम्यान आपल्या बुटांवर एका संदेश लिहिला होता. यावरुन चर्चा रंगली आहे. उस्मान ख्वाजा याने संदेश लिहिल्या बुटाचा (Usman Khwaja Message on Shoes) फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी आता आयसीसी काय भूमिका घेते याकडे क्रिकेट जगताचं लक्ष लागलं आहे.
उस्मान ख्वाजाने बुटांवर काय लिहिलं?
पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघ जोरदार सराव करतोय. सरावादरम्यान ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा याने जे बूट घातले होते, त्यावर पेनाने एक संदेश लिहिला होता. यात त्याने म्हटलं होतं, 'स्वातंत्र्य हा मानवी हक्क आहे आणि सर्व जीव समान आहे' वास्तविक हा संदेश त्याने पॅलेस्टाईनच्या (Palestine) समर्थनार्थ लिहिला आहे. इस्त्राईल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर उस्मान ख्वाजने हा संदेश दिला आहे. ,सामन्याआधी हा फोटो व्हायरल झाल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. आयसीसीच्या नियमानुसार कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यात कोणताही खेळाडून राजकीय वक्तव्य किंवा राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न करु शकत नाही.
उस्मान ख्वाजाने सामन्यात नाही तर सरावात पॅलेस्टाईनला समर्थन करणारा संदेश लिहिलेले बूट घातले होते. त्यामुळे आयसीसी त्याच्यावर काय कारवाई करणार याकडे क्रिकेट जगताचं लक्ष लागलं आहे. उस्मान ख्वाजाने याआधीही इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धावर भाष्य केलं आहे. त्याने पॅलेस्टाईनचं समर्थन करत आंतरराष्ट्रीय पातळीवर या प्रकरणात दखल देण्याची अपील केलीय.
अनेख खेळाडू पॅलेस्टाईच्या समर्थनार्थ
उस्मान ख्वाजा नाही तर इतर अनेक खेळाडूंनी इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्धावर वक्तव्य केलं आहे. याआधी पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद रिझवानने पॅलेस्टाईनला समर्थन करणारं वक्तव्य केलं होतं. रिझवानने आपलं शतक गाझाला समर्पित केलं होतं. याबाबत त्याने अनेकवेळा ट्विटही केलं. यावर आयसीसीने मोहम्मद रिझवान आणि पीसीबीला फटकार लगावली होती. पाकिस्तानचा शादाब कान, हॅरिस रौप, मोहम्मद नवाज, सलमान आगा, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, फहीम अश्रफ, या खेळाडूंनी पॅलेस्टाईनचा झेंडा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत पाठिंबा दिला होता.