भारतात सुरु होणार IPL सारखी आणखी एक टी20 लीग, 13 फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव
T20 League in India: बीसीसीआयकडून आणखी एका टी20 लीगची घोषणा करण्यात आली आहे. या लीगची सर्व तयारी पूर्ण झाली असून खेळाडूंच्या लिलावाची तारीखही समोर आली आहे.
T20 League in India: भारतात लवकरच आयपीएलसारखी (IPL) आणखी एक टी20 लीग (T20 League) सुरु होणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) या लीगची संपूर्ण तयारी केली आहे. इतकंच नाही तर खेळाडूंच्या लिलावाची (Player Auction) तारीखही ठरली आहे. पण लीगमध्ये पुरुष नाही तर महिला सहभागी होतील. बीसीसीआयकडून (BCCI) महिला प्रीमिअर लीगची (WPL) घोषणा करण्यात आली असून या स्पर्धेतील सर्व संघ विकले गेले आहेत.
महिली प्रीमिअर लीगचा पहिला हंगाम
भारतात होणाऱ्या पहिल्या महिला प्रीमिअर लीगसाठी येत्या तेरा फेब्रुवारीला खेळाडूंची लिलाव प्रक्रिया मुंबईत पार पडेल. बीसीसीआयच्या मोठ्या अधिकाऱ्याने याची माहिती दिली आहे. सर्व संघाच्या फ्रेंचाईजींना तारीख आणि जागेची माहिती देण्यात आली आहे.
असा असेल स्पर्धेचा फॉर्मेट
या टी20 लीगच्या पहिल्या हंगामात एकूण 22 सामने खेळवले जातील. रॉबिन राऊंडमध्ये अव्वल स्थानावर असणारा संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघ फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आपापसात भिडतील. खेळाडूंवर बोली लावण्यासाठी प्रत्येक फ्रेंचाईजीकडे 12 करोड रुपये असतील. प्रत्येक फ्रेंचाईजीला कमीत कमी 15 आणि जास्तीत जास्त 18 खेळाडू विकत घ्यावे लागतील. संघाच्या प्लेईंग XI मध्ये पाच परदेशी खेळाडूंना घेण्याची मुभा असेल.
5 टीम 4669.99 कोटी रुपये
पहिल्या महिला प्रीमिअर क्रिकेट लीगमध्ये एकुण 5 संघ असतील आणि पहिल्याच हंगामात हे संघ तब्बल 4669.99 कोटी रुपयांना विकले गेलेत. यात सर्वाधिक महागडा संघ अहमदाबादचा ठरला आहे. अदानी स्पोर्ट्सलाईनने अहमदाबात संघ तब्बल 1289 कोटी रुपयांना विकत घेतलाय. याशिवाय मुंबई, बंगळुरु आणि दिल्ली संघ अनुक्रमे 912.99 कोटी, 901 कोटी आणि 810 कोटी रुपयांना विकले गेलेत. तर कॅप्री ग्लोबल होल्डिंग कंपनीने लखनऊ संघ 757 कोटी रुपयांना विकत घेतला.
मार्चमध्ये महिला प्रीमिअर लीग?
बीसीसीआयने महिला प्रीमिअर लीगच्या वेळापत्रकाची घोषणा अद्याप केलेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही स्पर्धा याचवर्षी 4 ते 26 मार्च दरम्यान होऊ शकते. पहिल्या हंगामात पाच संघांमध्ये एकूण 22 सामने खेळवले जाण्याची शक्यता आहे. हे सर्व सामने मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअम आणि नवी मुंबईतल्या डिवाय पाटील स्टेडिअमवर खेळवले जाऊ शकतात.