Musheer Khan in Duleep Trophy : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सर्फराज खानचा भाऊ मुशीर खानने (Musheer Khan) दुलीप ट्रॉफी स्पर्धेत  (Duleep Trophy 2024) क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेतलं आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या मुशीर खानने दमदार फलंदाजी करत शतकं ठोकलं. या खेळीबरोबरच मुशीरनने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) तीस वर्ष जुना विक्रमही मोडला आहे. इंडिया बीकडून (India B) खेळणाऱ्या मुशीर खानने इंडिया ए विरुद्ध 181 धावांची तुफान खेळी केली. मुशीर खानच्या फलंदाजीच्या जोरावर इंडिया बीने पहिल्या डावात 321 धावा केल्या. 

 

पहिल्याच दिवशी शतक

इंडिया ए आणि इंडिया बी सामन्याच्या पहिल्याच दिवसात मुशीर खानने (Musheer Khan)  आक्रमक फलंदाजी करत शतक ठोकलं. 19 वर्षांच्या मुशीर खानच्या फलंदाजीचं सर्वांनीच कौतुक केलं आहे. दुसऱ्या दिवशीही मुशीरने आक्रमक फलंदाजी केली. पण दुहेरी शतकापासून तो थोडक्या हुकला. मुशीर खान 181 धावांवर बाद झाला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुशीर खानची दीडशेहून अधिक धावांची ही दुसरी खेळी आहे. या खेळीत मुशीरने 373 धावात 16 चौकार आणि 5 षटकार मारत 181 धावा केल्या. 

 

सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला

दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या पदार्पणात मुशीर खानची 181 धावांची खेळी तिसरी सर्वोत्तम खेळी ठरली आहे. मुशीर खानने सचिन तेंडुलकरचा 33 वर्ष जुना विक्रमही मागे टाकलाय. 1991 मध्ये सचिन तेंडुकरने गुवाहाटीत वेस्ट झोनकडून खेळताना ईस्ट झोनविरुद्ध 159 धावा केल्या होत्या. हा विक्रम मुशीर खानने आता मागे टाकला आहे. मुशीर खानच्या पुढे आता बाबा अपराजीत आणि यश ढुल  पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. बाबा अपराजीतने 212 धावा केल्या होत्या. दुलीप ट्रॉफीच्या पदार्पणात दुहेरी शतक करणारा बाबा अपराजीत हा एकमेव खेळाडू आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या यश ढुलने पदार्पणाच्या सामन्यात 193 धावा केल्या होत्या.

 

इंडिया बी मजबूत स्थितीत

मुशीर खानने केलेल्या 181 खेळीच्या जोरावर इंडिया बीने 321 धावा केल्या आहेत. मुशीर खाननला नवदीप सैनीचीही चांगली साथ मिळाली. सैनीने अर्धशतक केलं. मुशीर खानने आतापर्यंत 7 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात तीन शतकं आणि एक अर्धशतक केलं आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 203 आहे.