मुंबई इंडियन्सनंतर रोहितकडून टीम इंडियाचं कर्णधारपदही जाणार? हार्दिक पांड्याच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट
Hardik Pandya Injury Update : क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या लवकरच मैदानावर उतरण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्याच्या ट्रेनिंगचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Hardik Pandya Injury Update: नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यातूनही त्याने माघार घेतली. पण आता हार्दिक पांड्याच्या फिटनेसबाबत नवी माहिती समोर आली आहे. हार्दिक पांड्या लवकरच टीम इंडियात (Team India) पुनरागमन करण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर हार्दिक पांड्याचा एक फोटो वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल फोटोत हार्दिक पांड्या फिटनेस ट्रेनिंग (Fitnesss Training) करताना दिसत आहे. त्यामुळे हार्दिक पांड्या मैदानावर उतरण्यासाठी सज्ज असल्याचं बोललं जातंय.
विश्वचषकादरम्यान हार्दिक दुखापतग्रस्त
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना हार्दिक पांड्याला दुखापत झाली. वेगाने येणारा चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात हार्दिकच्या पायाला फटका बसला. त्यानंतर हार्दिकने मैदान सोडलं. दुखापत गंभीर असल्याने संपूर्ण विश्वचषकात हार्दिकने माघार घेतली. विश्वचषक स्पर्धेनंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यातूनही हार्दिक पांड्याला वगळण्यात आलं. दक्षिण आफ्रिका दौऱ्यांतर भारतीय संघ अफगाणिस्ताविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे (India vs Afghanistan). भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान पहिल्यांदाच तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. यातला पहिला सामना 11 जानेवारीला रंगणार आहे. पण मालिकेतही हार्दिक पांड्या खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार?
अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत खेळणार नसला तरी हार्दिक आता पूर्णपणे फिट असून लवकरच तो मैदानात उतरणार असल्याचं बोललं जात आहे. यंदाच्या वर्षात आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धा होणार असून अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियात रोहित शर्मा खेळणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टी20 विश्वचषकात रोहित शर्माऐवजी हार्दिक पांड्याकडेच टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाणार आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार
टी20 विश्वचषकापूर्वी होणाऱ्या आयपीएलमध्येही हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. आयपीएल लिलावापूर्वी मुंबई इंडियन्से हार्दिक पांड्याला ट्रेड करत आपल्या संघात घेतलं. त्यानंतर काहीच दिवसात रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पांड्या मुंबई इंडिन्सचा कर्णधार असल्याची घोषणाही केली. गुजरात टायटन्सआधी हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघातून खेळला आहे. 2015 च्या आयपीएल हंगामात हार्दिक पांड्या पहिल्यांदा मुंबई संघातून खेळला. त्यावंतर 2021 पर्यंत त्याने मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व केलं. 2022 मध्ये गुजरात टायटन्सने आयपीएलमध्ये प्रवेश केला आणि हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सचा कर्णधार बनला. गुजरातने पहिल्याच हंगामात आयपीएलचं जेतेपदही पटकावलं.