मोठी बातमी! ऑलिम्पिकमध्ये रंगणार क्रिकेटचे सामने; IOC ने केलं शिक्कामोर्तब
Cricket In Olympics 2028: मुंबईमध्ये सध्या सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड कनव्हेंशन सेंटरमध्ये सध्या आयओसीची बैठक पार पडली.
Cricket In Olympics 2028: 2028 साली अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे खेळण्यात येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचाही समावेश होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबईमध्ये सध्या सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC च्या )बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड कनव्हेंशन सेंटरमध्ये सध्या आयओसीची बैठक सुरु आहे. याच बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
उद्या होणार सविस्तर चर्चा
"लॉस एंजेलिस समितीने 5 खेळांचा या स्पर्धेत समावेश करता येईल असं म्हटलं आहे. यामध्ये क्रिकेटचाही समावेश आहे. कार्यकारी समिती यावर उद्या होणाऱ्या बैठकीमध्ये चर्चा करेल," असं अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे स्पोर्ट्स डायरेक्टर असलेल्या किर्ती मॅककॉनेल यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीत म्हटलं आहे.
128 वर्षांपासूनची मागणी
लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिकचं आयोजन करणाऱ्या समितीने सोमवारी क्रिकेटचाही ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला. यासंदर्भातील मागणी मागील 128 वर्षांपासून केली जात होती. 1900 साली पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता.
आयसीसीने जारी केलेलं पत्रक
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने यासंदर्भातील अधिकृत पत्रक 9 ऑक्टोबर रोजी जारी केलं. ऑलिम्पिक समितीच्या बैठकीमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला जाईल असं सांगण्यात आलं होतं. "2 वर्ष आयसीसी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक समितीबरोबर चर्चा करत होती. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासंदर्भातील संपूर्ण तयारीनंतर हा प्रस्ताव मांडण्यात आला. आता ही समिती बैठकीमध्ये यावर चर्चा करेल," असं 9 तारखेला आयसीसीने सांगितलं होतं.
नीता अंबानींनी केलेलं आयओसी अध्यक्षांचं स्वागत
अंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष असलेले थॉमस बाच हे काही दिवसांपूर्वीच मुंबईत दाखल झाले. नीता अंबानी यांनी मुंबईमधील आपल्या निवासस्थानी म्हणजेच अॅटीलियावर बाच यांचं स्वत: औक्षण करुन स्वागत केलं. 15 ते 17 ऑक्टोबरदरम्यान थॉमस हे मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईत आयओसीची 141 वी बैठक पार पडत आहे. भारतामध्ये होणारी आयओसीची बैठक अनेक अर्थांनी खास आहे. तब्बल 40 वर्षानंतर भारतामध्ये ही बैठक पार पडत आहे. नीता अंबानी या अंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीच्या सदस्या असून त्यांच्या प्रयत्नांनीच भारताला या बैठकीचं आयोजन करण्याची संधी मिळाल्याचं सांगितलं जातं. मुंबईमध्ये 2023 साली ही बैठक घेतली जावी यासंदर्भातील प्रस्ताव 139 व्या बैठकीमध्ये नीता अंबानींच्या अध्यक्षतेखाली, भारतीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष डॉ. नरिंद्र बत्रा, केंद्रीय खेळ मंत्री अनुराग ठाकूर आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाद अभिनव बिंद्रा यांच्या टीमने मांडला होता. हा प्रस्ताव मान्य करण्यात आला.
रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून ऑलिम्पिक तसेच खेळांसंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जागृकता निर्माण करण्याचं काम करत आहेत. 2028 च्या ऑलम्पिक स्पर्धांमध्ये क्रिकेटचाही समावेश करण्यात येणार असल्याने अंबानी यासाठी पुढाकार घेत असल्याचीही चर्चा क्रिकेट विश्वात आहे.