Asia Cup 2023 Ind vs Lanka : एशिया कपच्या सुपर-4 मध्ये मगंळवारी झालेला भारत आणि श्रीलंकेदरम्यानचा सामना जबरदस्त चुरशीचा झाला. टीम इंडिया अवघ्या 213 धावांवर ऑलआऊट झाली. पण विजयाचं हे माफक आव्हानही लंकेला पार करता आला नाही. त्यांचा 41 धावांनी पराभव झाला. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या लंकेला फायदा उचलता आला नाही. पण हा पराभव लंकेच्या चाहत्यांना पचवता आला नाही. सामना संपल्यानंतर स्टेडिअममध्ये जोरदार हंगामा  (Fans Fight) झाला. श्रीलंकेच्या चाहत्यांनी स्टेडिअममध्ये बसलेल्या भारतीय प्रेक्षकांवर हल्ला केला. सोशल मीडियावर (Social Media) याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल झालेल्या व्हिडिओत श्रीलंकन फॅन्स (Sri Lankan Fans) जोरजोरात आरडाओरडा करताना दिसत आहेत. त्यानंतर काही लंकन फॅन्स भारतीय प्रेक्षकांवर रागाने धावून जातात आणि त्यांना मारहाण करताना दिसत आहेत. काही प्रेक्षक यात मध्यस्थी करतानाही दिसत आहेत. पण यानंतरही एक व्यक्ती मारहाण करत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पराभव खिलाडीवृत्तीने स्विकारला पाहिजे अशा प्रतिक्रिया युजर्स देतायत. 


श्रीलंकेन फॅन्स का भडकले?
आता प्रश्न असा आहे की श्रीलंकन फॅन्स का भडकले? मंगळवारी झालेल्या सामन्यात विजयाच्या जवळ येऊन श्रीलंका क्रिकेट संघाला पराभव पत्करावा लागला होता. भारतीय गोलंदाजांनी लंकेच्या तोंडातला विजयाचा घास अक्षरश: हिसकावून घेतला. साहजिकच या पराभवाने श्रीलंकन फॅन्सचा स्वत:वरचा ताबा सुटला.


टीम इंडियाचा शानदार विजय
श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांसमोर टीम इंडिया अवघ्या 213 धावांवर आटोपली. 20 वर्षांच्या वेल्लालागेच्या फिरकीसमोर टीम इंडियाची भक्कम फलंदाजी अक्षरश: ढेपाळली. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली की संपूर्ण भारतीय संघ फिरकीसमोर ढासळला. श्रीलंका सहज विजय मिळवणार असं वाटत असतानाच भारतीय गोलंदाजांनी गेम फिरवलाय. श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 172 धावांवर ऑलआऊट झाला. भारताने 41 धावांनी शानदार विजय मिळवला आणि एशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीतही धडक मारली. 



भारतीय संघ अंतिम फेरीत
श्रीलंकेच्याआधी भारताने पाकिस्तानचा तब्बल 228 धावांनी पराभव केला होता. विराट कोहली आणि केएल राहुलची शतकी खेळी आणि कुलदीप यादवच्या फिरकी गोलंदाजीसमोर पाकिस्तान संघाने शरणागती पत्करली आणि क्रिकेट इतिहासात भारताने पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवला. सलग दोन विजय मिळवल्याने भारतीय संघाने एशिया कपच्या अंतिम फेरीत धडक मारलीय.


कोण खेळणार फायनल?
भारतीय संघाने फायनलमध्ये धडक मारली असली तर भारतीय संघाबरोबर अंतिम सामन्यात कोण खेळणार याचा फैसला अद्याप व्हायचा आहे. 14 सप्टेंबरला पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या सामन्यात अंतिम फेरीतचं स्थान निश्चित होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलका संघाच्या खात्यात प्रत्येकी 2 अंक जमा आहेत. त्यामुळे जो संघ जिंकेल तो अंतिम फेरी गाठेल. 


एशिया कपच्या इतिहासात अंतिम फेरीत भारत-पाकिस्तान सामना झालेला नाही, पण यावेळी हे दोनही संघ आमने सामने येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.