India Tour of Sri Lanka: विश्वचषक स्पर्धेतील पराभवाचं दु:ख विसरून टीम इंडियाने (Team India) नव्याने सुरुवात केली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळतेय. या मालिकेतील तीन सामने खेळवण्यात आले असून टीम इंडियाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या (India Tour of South Africa) मोठ्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 टी20, 3 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. या दरम्यान भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) एका नव्या क्रिकेट मालिकेची घोषणा केली आहे. भारत आणि श्रीलंकादरम्यान ही क्रिकेट मालिका होणार असून जुलै महिन्यात खेळवली जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत-श्रीलंका मालिका
बीसीसीआय आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाने बुधवारी या मालिकेची घोषणा केली. यानुसार 2024 जुलैमध्ये भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाईल (India Tour of Sri Lanka). या दौऱ्यात दोन्ही संघात 3 एकदिवसीय आणि 3 टी20 सामने खेळवले जातील. सामन्यांची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.  महत्त्वाचं म्हणजे या मालिकेआधी टी20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने 2024 चं आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडर जाहीर केलं आहे. श्रीलंकेचा संघ नव्या वर्षाची सुरुवात जानेवारीत झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेने करणार आहे. 


भारताचं क्रिकेट कॅलेंडर
जुलै महिन्यात भारत आणि श्रीलंका दरम्यान 3 एकदिवसीय सामने आणि 3 टी20 सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. या मालिकेत एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी20 सामने खेळवले जाणार आहे. या दरम्यान टी20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. टी20 विश्वचषक स्पर्धेचं आयोजन वेस्टइंडिज आणि अमेरिकेत होणार आहे. यानंतर भारत, न्यूझीलंड आणि वेस्टइंडिजचा संघ श्रीलंका दौऱ्यावर जाईल. 


रोहित-विराट खेळणार?
विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियात काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माने (Rohit Sharma) ब्रेक घेतला आहे. त्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा यापुढे व्हाईटबॉल क्रिकेटमध्ये यापुढे खेळणार नाहीत अशी चर्चा आहे. त्यातच विराट कोहलीने केलेल्या एका पोस्टमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे भविष्यात टीम इंडियामध्ये नवे चेहरे दिसण्याची शक्यता आहे. रोहित शर्मानंतर केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह टीम इंडियात कर्णधारपदाचे दावेदार आहेत.