India vs Australia 3rd T20I: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तिसरा टी20 सामना आज खेळवला जाणार आहे. गुवाहाटीतल्या बरसपारा स्टेडिअममध्ये भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिली दोन सामने जिंकत टीम इंडियाने (Team India) 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता तिसरा टी20 सामना जिंकत विजयाची हॅटट्रीक करण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली यंग ब्रिगेड मालिका जिंकण्याचा विक्रम करणार आहे. तिसऱ्या टी20 सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव संघात काही बदल करण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल?
पहिल्या दोन सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहची (Arshdeep Singh) कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे तिसऱ्या टी20 सामन्यात अर्शदीप सिंहच्या जागी आवेश खानला संधी मिळण्याची शक्यता आहे. अर्शदीप सिंह पहिल्या दोन सामन्यात अक्षरश: फ्लॉप ठरला आहे. दोन टी20 सामन्यात अर्शदीपने केवळ एक विकेट घेतली आहे. पहिल्या सामन्यात अर्शदीपने 4 षटकात तब्बल 41 धावांची खैरात केली होती त्यामुळे गुवाहाटीतल्या तिसऱ्या टी20 सामन्यात अर्शदीपच्या जागी आवेश खानला (Awesh Khan) प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. आवेश खानने भारतासाठी 16 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 16 विकेट घेतल्या आहेत. 


याशिवाय प्रसिद्ध कृष्णा आणि मुकेश कुमार संघात कायम राहतील. तर अक्षर पटेल आणि रवी बिश्नोईवर फिरकीची मदार असणार आहे. 


फलंदाजीत एक बदल
टीम इंडियाची युवा टॉप ऑर्डर जबरदस्त फॉर्मात आहे. सलामीचे यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड संघाला आक्रमक सुरुवात करुन देतायत. दुसऱ्या टी20 सामन्यात जयस्वालने अवघ्या 25 चेंडूत 53 धावा केल्या होत्या. याशिवाय कर्णधार सूर्यकुमार यादव, ईशान किशन, रिंकू सिंग, अशी आक्रमक फलंदाजांची फळी आहे. पण तिलक वर्माला या सामन्यात बाहेर बसावं लागण्याची शक्यता आहे. तिलक वर्माच्या जागी आक्रमक फलंदाज श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer) एन्ट्री होऊ शकते. 


पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिली फलंदाजी करताना 208 धावा केल्या होत्या. हे आव्हान टीम इंडियाने अवघ्या 3 विकेटच्या मोबदल्यात पार केलं. तर दुसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाने पहिली फलंदाजी करताना 235 धावांचा डोंगर उभा केला होता. तर ऑस्ट्रेलियाला 191 धावात गुंडाळलं होतं. पहिल्या दोन टी20 सामन्यातच भारतीय फलंदाजांनी 36 चौकार आणि 24 षटकारांची बरसात केली आहे.