Team India T20 Series : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी दणदणीत जिंकली. या विजयाबरोबर टीम इंडियाने (Team India) एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचा बदलाही घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. अशाच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंनी स्वत:ला सिंद्ध करुन दाखवलं. आगामी टी20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियासाठी ही चांगली बातमी आहे. पण यामुळे विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्माचं (Rohit Sharma) टी20 क्रिकेटमधल युग संपलं का हा प्रश्न उपस्थित होतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी20 विश्वचषकाआधी तयारी
टी20 विश्वचषक 2024 आधी ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी20 मालिका टीम इंडियासाठी महत्वाची होती. आगामी टी20 विश्वचषक स्पर्धा 4 जून ते 30 जून दरम्यान वेस्टइंडिज आणि अमेरिकेत खेळवली जाणार आहे. त्याआधी टीम इंडियाला युवा खेळाडूंच्या रुपाने नवे मॅचविनर गवसले आहेत. 


रिंकू सिंह टीम इंडियाचा Mister Finisher
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत रिंकू सिंह (Rinku Singh) मॅच फिनिशर म्हणून समोर आला आहे. पहिल्या सामन्यात रिंकूने 22 धावा करत टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं. दुसऱ्या सामन्यात 31 धावा करत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तर रायपूर टी20 सामन्यात 46 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. टी20 विश्वचषकात रिंकू सिंह भारतासाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो.


मुकेश: भारताचा नवा वेगवान गोलंदाज
वेगवान गोलंदाज मुकेश कुमार या मालिकेत टीम इंडियासाठी नवा पर्याय म्हणून समोर आलाय. टी20 मालिकेत इतर वेगवान गोलंदाजांची धुलाई होत असताना मुकेश कुमारने (Mukesh Kumar) ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखून धरण्याचं काम केलं. बंगळुरुत मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात मुकेश कुमारने 3 विकेट घेत सामन्याचं चित्रच पालटवलं.


मधल्या फळीत ऋतुराज गायकवाडचा जलवा
मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने पाच टी20 सामन्यात 55.75 अॅव्हरेजने 223 धावा केल्या. यात एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. या टी20 मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तो अव्वल फलंदाज ठरलाय. ऋतुराजची स्वत:ची वेगळी स्टाईल आहे. खेळपट्टीवर जम बसवण्यासाठी वेळ घेतो, पण त्यानंतर धावांची बरसात करतो. टी20 विश्वचषकासाठी ऋतुराजने आपला दावा ठोकला आहे. 


रवी बिश्नोई-अश्रर पटेल ठरणार ट्रम्प कार्ड
टीम इंडियाच्या मालिका विजयात फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईने महत्त्वाची भूमिका बजावली. रवीने या मालिकेत सर्वाधिक 9 विकेट घेतल्या. प्लेअर ऑफ द सीरिजचा तो मानकरीही ठरला. रवीला अक्षर पटेलची चांगली साथ लाभली. दुखापतीमुळे अक्षर पटेल विश्वचषकात खेळू शकला नही. पण ही कमी त्याने टी20 मालिकेत भरून काढली. अक्षरने पाच सामन्यात 6 विकेट घेतल्या. रवी-अक्षर या फिरकी गोंलंदाजांनी टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिलं. 


सूर्यकुमार टी20चा नवा कर्णधार
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत भारतीय संघाला टी20 क्रिकेटसाठी कर्णधारपदाचा नवा पर्याय सापडला आहे. मैदानावर शांत आणि संयमी राहात सूर्यकुमारने संघाला जिंकण्याचा विश्वास दिला. त्याचबरोबर त्याने स्वत:ही चांगल्या खेळी केल्या. पाच सामन्यांपैकी चार सामन्यात सूर्या टॉस हरला. पण संघाच्या मानसिकेत कोणताही बदल होऊ दिला नाही. पाचपैकी चार सामने जिंकत त्याने स्वत:ला सिंद्ध केलंय. आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही टी20 संघांचं कर्णधारपद सूर्यकुमारवर सोपवण्यात आलं आहे.