यशस्वी जयस्वालने रचला इतिहास, सुनील गावसकरांचा 51 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
India vs Bangladesh : बांगलादेशविरुद्धच्या चेन्नई कसोटीवर टीम इंडियाने मजबूत पकड मिळवलीय. टीम इंडिया विजयापासून अवघ्या 6 विकेट दूर आहे. त्याआधी या सामन्यात टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वलाने एक अनोक विक्रम रचला आहे.
India vs Bangladesh : बांगलादेशविरुद्धच्या चेन्नई कसोटीवर टीम इंडियाने मजबूत पकड मिळवलीय. टीम इंडिया (Team India) विजयापासून अवघ्या 6 विकेट दूर आहे. टीम इंडियाने बांगलादेशसमोर विजयासाठी 514 धावांचं बलाढ्य आव्हान ठेवलं आहे. याला उत्तर देताना बांगलादेशने दुसऱ्या डावात 4 विकेट गमावत 158 धावा केल्या आहेत. बांगलादेशला विजयासाठी आणखी 357 धावांची आवश्यता आहे. चेन्नई कसोटीत (Chennai Test) टीम इंडियाचा विजय जवळपास निश्चित मानला जात असून सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडिया विजयाचं सोपस्कर पूर्ण करेल अशी शक्यता आहे.
यशस्वी जयस्वालने रचला इतिहास
टीम इंडियासाठी बांगलादेशविरुद्धचा पहिला कसोटी सामना रेकॉर्डब्रेक ठरला आहे. पहिल्या डावात आर अश्विनने तर दुसऱ्या डावात शुभमन गिल आणि ऋषभ पंतने शानदर शतकं ठोकली. गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने चारशे विकेटचा टप्पा पूर्ण केला. पण एक विक्रम असाही होता जो तब्बल 51 वर्षांनी मोडला गेला. टीम इंडियाचा आक्रमक युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) पहिल्या दहा कसोटी सामन्यात धावांचा डोंगर रचत लिटील मास्टर सुनील गावसकर यांचा विक्रम मागे टाकला आहे. जयस्वलाने महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे.
10 कसोटीत धावांचा डोंगर
बांगलादेशविरुद्धचा हा कसोटी सामना जशस्वी जायस्वलाच्या कसोटी कारकिर्दीतील दहावा कसोटी सामना आहे. चेन्नईच्या चेपॉक कसोटीच्या (Chennai Test) पहिल्या डावात यशस्वी जयस्वालने अर्धशतकी खेळी केली. पण दुसऱ्या डावात जयस्वालची बॅट तळपली नाही. अवघ्या 10 धावा करुन जयस्वाल पॅव्हेलिअन परतला. पण यातही यशस्वीने एक विक्रम आपल्या नावावर केलाय. पहिल्या दहा कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करण्यात जयस्वालने सुनील गावसकर यांना मागे टाकलं आहे.
पहिल्या 10 कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सर डॉन ब्रॅडमन अव्वल स्थानावर आहेत. ब्रॅडमन यांनी पहिल्या दहा कसोटीत 1446 धावा केल्या. तर यशस्वी जयस्वालच्या नावावर पहिल्या 10 कसोटीत 1094 जमा झाले आहेत. भारतीय खेळाडूंमध्ये जयस्वाल टॉपवर आहे तर जागतिक यादीत जयस्वाल चौथ्या क्रमांकावर आहे. सुनील गावसकर यांचा विक्रम मोडला कसोटी पदार्पणात सुनील गावसकर यांनी धावांची बरसात केली होती. पहिल्या दहा कसोटी गावसकर यांच्या नावावर 978 धावा जमा आहेत. पण हा विक्रम आता यशस्वी जयस्वालने मागे टाकला आहे.