Ind vs Eng 2nd Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणमध्ये (Visakhapatnam) खेळला जातोय. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit) टॉस जिंकत पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. सलामीला आलेल्या यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) सामन्याच्या पहिल्याच दिवशी तुफानी खेळी केली. षटकार मारत त्याने आपलं शतक पूर्ण केलं. अवघ्या 154 चेंडूत जयस्वलाने 102 धावा केल्या. यात त्याने 11 चौकार आणि 3 षटकार लगावले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेझबॉल रणनीती
कसोटी मालिकेच्या सुरुवातीला इंग्लंड भारतात बेझबॉल रणनितीने खेळणार असल्याचं सांगितलं जात होतं. पण दुसऱ्या कसोटीत इंग्लंडची ही रणनिती त्यांच्यावरच उलटली. यशस्वी जयस्वाल बेझबॉल रणनितीने सुरुवातीपासून इंग्लंडच्या गोलंदाजांवर तुटून पडला. रोहित शर्माच्या साथीने जयस्वालने सावध सुरुवात केली. पण जम बसल्यावर मात्र त्याने इंग्लिश गोलंदाजांची पिसं काढली. आपल्या शतकी खेळीत जयस्वालने तब्बल 3 षटकार ठोकले. 94 धावांवर असतानाच जयस्वलाने टॉम हार्टलीच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार ठोकत आपलं शतक पूर्ण केलं. 


जयस्वालचं दुसरं कसोटी शतक
कसोटी कारकिर्दीतलं यशस्वी जयस्वालचं हे दुसरं शतक आहे. यशस्वी जयस्वालने 12 जुलै 2023 मध्ये वेस्टइंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केलं. पदार्पणात त्याने शतक ठोकलं. यशस्वी जयस्वालचा क्रिकेट कारकिर्दीतला हा सहावा कसोटी सामना आहे. यात त्याने दोन शतक आणि दोन अर्धशतक करत 400 हून अधिक धावा केल्या आहेत. यशस्वी जयस्वालच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजवलंय. 


रोहित-गिल पुन्हा अपयशी
एकीकडे यशस्वी जयस्वाल एकाने खिंड लढवत असातना दुसऱ्या बाजूला कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि युवा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) पुन्हा एकदा फ्लॉप ठरले. रोहित शर्मा केवळ 14 धावा करुन बाद झाला. इंग्लंडचा युवा मिस्ट्री गोलंदाज शोएब बशीरच्या गोलंदाजीवर रोहित ओली पोपकडे झेल देऊन बाद झाला. तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला शुभमन गिल 34 धावा करुन बाद झाला. इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडकरसनने त्याला पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. रोहित आणि शुभमन गिल पहिल्या कसोटीतही अपयशी ठरला होते. 


भारतः रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएस भरत, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार


इंग्लंड : बेन स्टोक्स (कर्णधार), जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर आणि जेम्स एंडरसन.