India vs West Indies 1st T20 : वेस्टइंडिजविरुद्धच्या टी 20 मालिकेची सुरुवात टीम इंडियाने  (Team India) पराभव केली. ब्रायन लारा स्टेडिअमवर (Brian Lara Stadium) खेळल्या गेलेल्या पहिल्या टी 20 सामन्यात यजमान विंडिजने हार्दिक पांड्याच्या युवा संघाचा 4 धावांनी पराभव केला. वेस्ट इंडिजने पहिली फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 150 धावांचं आव्हान ठेवलं होतं. याला उत्तर देताना टीम इंडियाने नऊ विकेट गमावत 145 धावा केल्या. भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यानचा दुसरा सामना आता 6 ऑगस्टला गयाना खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात भारताच्या पराभवाचं मुख्य कारण ठरलं ती फलंदाजी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या तिलक वर्माला सोडल्यास टीम इंडियाचे इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलामीला आलेल्या ईशान किशन आणि शुभमन गिलने आक्रमक फलंदाजीच्या नादात आपली विकेट फकेली. तर चांगल्या सुरुवातीनंतर कर्णधार हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसन याचा फायदा उठवू शकले नाहीत. दुसरीकडे सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म अजूनही कायम आहे. 


सामन्यात एक वेळ अशी होती, जेव्हा भारताला विजयासाठी 30 चेंडूत 37 धावांची गरज होती. त्यावेळी कर्णधार हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसन खेळपट्टीवर होते. भारतीय संघ हा सामना जिंकणार हे जवळपास निश्चित झालं होतं. पण सामन्याच्या सोळाव्या षटकात संपूर्ण चित्रच पालटलं. विंडिजचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेसन होल्डरने हार्दिक पांड्याला क्लिन बोल्ड केलं. काही वेळातच संजू सॅमसनही रनआऊट झाला आणि सामना विंडिजच्या बाजूने झुकला. अष्टपैलू अक्षर पटेलने सामना खेचून आणण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला. शेवटी अवघ्या काही धावांनी भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं. 


रोहित-विराटशिवाय टीम इंडिया अपूर्ण
टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीला टी20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. पण पहिल्या टी20 सामन्यात संघाला या दोघांची  कमी जाणवली. प्रेशरमुळे फलंदाज ढेपाळलेले दिसले. रोहित शर्मा सलामीला येऊन आक्रमक फलंदाजी करत चांगली सुरुवात करुन देतो. तर तिसऱ्या स्थानावर विराट कोहली संघाला आधार देतो. विराटचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विराट खेळपट्टीवर सेट झाला की सहसा तो आपली विकेट फेकत नाही. अगदी या ऊलट विंडिजविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात पाहिला मिळालं. टीम इंडियाला ना चांगली सुरुवात मिळाली, ना विजयी फिनिश करु शकले. 


कोहली-विराटचा संघाला आधार
रोहित-विराट संघातील युवा खेळाडूंमध्ये जोश निर्माण करतात. एकदिवसीय मालिकेतही रोहित-कोहलीला बाहेर बसवणं महागात पडलं होतं. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा पराबव केला होता. कोहली आणि रोहित आता थेट पाकिस्तानात होणाऱ्या एशिया कप 2023 स्पर्धेत दिसणार आहेत. अशात त्यांच्या अनुपस्थितीत वेस्टइंडिजविरुद्धचे चार टी20 सामने टीम इंडियाची परीक्षा पाहाणारे ठरणार आहेत. विंडिजचा संघही कसोटी आणि एकदिवसीय मालिकेतील पराभवाचा बदला घेण्यासाठ उत्सुक आहे. 


हार्दिकच्या कर्णधारपदाची कसोटी
रोहित शर्मा आणि विराट कोहलीने गेल्या वर्षी विश्व चषक स्पर्धेनंतर एकाही टी20 सामना खेळलेला नाही. टी20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात न्यूझीलंड, श्रीलंकाविरुद्ध टी20 सीरिज खेळले आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने 12 पैकी 8 सामने जिंकले आहेत.