मुंबई : आयपीएलचा यंदाचा हंगाम हा अनेक कारणांनी चर्चेचा विषय ठरत आहे. आयपीएल १२ मध्ये चेन्नई आणि पंजाब या दोन संघांमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात अशीच धमाल पाहायला मिळाली. कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि फाफ ड्यू प्लेसिस या दोघांच्या फलंदाजीच्या आणि हरभजन सिंगच्या गोलंदाजीच्या बळावर चेन्नईच्या संघाने चौथा विजय मिळवला. पंजाबच्या संघावर चेन्नईने २२ धावांनी मात करत या विजयाचा आनंद साजरा केला. सामन्यात विजय मिळवल्यानंतर धोनी संघातील खेळाडूंच्या मुलांसोबत धमाल करताना दिसला. सोशल मीडियावर याचा एक व्हिडिओही पोस्ट करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर धोनी संघातील खेळाडू शेन वॉटसन आणि दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज इमरान ताहिरच्या मुलांसोबत चक्क शर्यत लावताना दिसला. धोनीचा हा अंदाज पाहून वॉटसन आणि ताहिरलाही त्यांचं हसू आवरता आलेलं नाही. किंबहुना या व्हिडिओमुळे '.....म्हणून आम्हाला धोनी आवडतो', असं म्हणायला क्रीडारसिकांना आणखी एक कारणच मिळालं आहे, असं म्हणायला हरकत नाही. 



पंजाब आणि चेन्नईच्या संघांमध्ये झालेल्या सामन्याविषयी सांगावं तर, चेन्नईच्या संघाने एमए. चिदंबरम स्टेडियममध्ये प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत तीन गड्यांच्या बदल्यात १६० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करत पंजाबच्या संघातील केएल राहुल (५५) आणि सरफराज खान (६७) यांच्या खेळीनंतरही हे लक्ष्य गाठता आलं नाही. अवघ्या १३८ धावांवरच पंजाबच्या संघाला या सामन्यात हार पत्करावी लागली. चेन्नईच्या बाजूने गोलंदाजी करणाऱ्या हरभजन सिंग ला या सामन्यात सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. सध्याच्या घडीला संघाच्या एकंदर कामगिरीच्या बळावर चेन्नईचा संघ गुणतालिकेत प्रथम स्थानावर पोहोचला आहे.