`मुंबई इंडियन्सबरोबरचा रोहित शर्माचा प्रवास संपला` दिग्गज क्रिकेटपटूच्या वक्तव्याने खळबळ
Rohit Sharma Mumbai Indians : आयपीएल 2025 पूर्वी मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच आता रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. रोहित शर्मा आयपीएलच्या नव्या हंगामात इतर संघाकडून खेळणार असल्याचं एका दिग्गज क्रिकेटपटूने सांगितलं आहे.
Akash Chopra on Rohit Sharma Mumbai Indians : आयपीएल 2025 साठी बराच अवधी असला तरी आतापासूनच अनेक घडामोडी घडत आहेत. नव्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव (IPL Auction 2025) पार पडणार आहे. या लिलावात अनेक दिग्गज खेळाडू दुसऱ्या संघात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई इंडियन्सचा हुकमी खेळाडू सूर्यकुमार यादव आरसीबीचा कर्णधार होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आता रोहित शर्माचा (Rohit Sharma) मुंबई इंडियन्सबरोबरचा (Mumbai Indians) प्रवास संपला असून आयपीएलच्या पुढच्या हंगामात रोहित नव्या संघातून खेळतान दिसेल असं वक्तव्य एका दिग्गज खेळाडूने केलं आहे. रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी ही मोठी बातमी आहे.
रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर?
भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवर आकाश चोप्राने (Aakash Chopra) मोठी घोषणआ केली आहे. रोहित शर्माचा मुंबई इंडियन्सबरोबरचा प्रवास संपला असल्याचा दावा आकाश चोप्राने केला आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर आकाश चोप्राने वक्तव्य केलं आहे. आकाश चोपडाच्या मते मुंबई इंडियन्स रोहित शर्माला रिटेन करणार नाही. नव्या हंगामापूर्वी होणाऱ्या लिलावात मुंबई इंडियन्स रोहित शर्माला रिलीज करेल, पण लिलावात रोहित शर्मा उपलब्ध नसेल. कारण ट्रेड विंडोच्या माध्यमातून तो दुसऱ्या संघात जाईल असा दावाही आकाश चोप्राने केला आहे.
रोहित शर्माची मुंबई इंडियन्सबरोबरची कामगिरी
रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स तब्बल पाच वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. पण आयपीएलच्या गेल्या हंगामात मुंबई इंडियन्स फ्रँचाईजीने रोहित शर्माची कर्णधारपदावरून उचलबांगडी करत हार्दिक पांड्याची नियुक्ती केली. पण यामुळे मुंबईकर क्रिकेट चाहते चांगले नाराज झाले आणि त्यांनी हार्दिक पांड्याला मैदानात आणि मैदानाबाहेरही चांगलंच ट्रोल केलं. या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरीही निराशाजनक होती. पॉईंटटेबलमध्ये मुंबई तळाला होती.
सूर्यकुमारही मुंबईतून बाहेर?
रोहित शर्माशिवाय सूर्यकुमार यादवबाबतही आकाश चोप्राने भविष्यवाणी केली आहे. सू्र्या मुंबई इंडियन्स सोडणार अशी चर्चा रंगतेय. पण सूर्यकुमार आयपीएलचा पुढचा हंगामही मुंबईतूनच खेळणार आहे, तो कुठेच जाणार नाही, असं आकाश चोप्राने म्हटलं आहे. आकाश चोप्राच्या मते मुंबई फ्रँचाईजी सूर्यकुमारला रिटेन करेल तर रोहित शर्माला रिलीज करेल.
सूर्यकुमार यादव टी20 भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. टी20 वर्ल्ड कप नंतर रोहित शर्माने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर भारताच्या टी20 संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवच्या हाती सोपवण्यात आलंय.