मुंबई : 'कॅप्टन कूल' असी ओळख असणाऱ्या महेंद्रसिंह धोनी यानं कायमच क्रिकेट मनाचा ठाव घेतला आहे. माहिच्या पहिल्या सामन्यापासून ते अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरील त्याच्या अखेरच्या सामन्यापर्यंत प्रत्येक वेळी एक नवा माही खेळपट्टीनं अनुभवला. (Mahendrasingh Dhoni)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फक्त क्रिकेट नव्हे, तर खासगी आयुष्यासाठीही त्याच्यावर कायमच सर्वांच्या नजरा खिळल्या. साक्षी सिंह रावत हिच्याशी त्यानं लग्नगाठ बांधत एका नव्या प्रवासाची सुरुवात केली. 


तिथं माही भारतीय संघाची धुरा सांभाळत असतानाच इथं त्याच्या घराचं कर्णधारपद पत्नी साक्षी हिनं सांभाळलं होतं. पण, या नात्याबद्दलच्या अशाही काही गोष्टी होत्या, ज्यांचा खुलासा साक्षीनं इतकी वर्षे केला नव्हता. 


ती कायम हसऱ्या चेहऱ्यानं सर्वांसमोर आली, याचा अर्थ सर्वच क्षण तिला आनंद देणारे होते का? तर याचं उत्तर आहे नाही.... का? खुद्द साक्षीनंच यामागचं कारणंही सांगितलं. 


चेन्नई सुपरकिंग्सच्या युट्यूब चॅनलवरील एका व्हिडीओमध्ये ती हे वक्तव्य करताना दिसली. 


काय म्हणाली साक्षी? 
'आम्हाला अभिमान वाटतो, कारण आमचे पती आज तिथं आहेत जिथं अब्जोंमधून त्यांची निवड झाली आहे... इथं सर्वांना आवडणारा खेळ ते खेळतात. 


तुम्ही एका नोकरदार व्यक्तीशी लग्न करता तेव्हा तो नोकरीवर जातो, आयुष्य बदलतं. पण, आमचे पती खेळ खेळण्यासाठी जातात. त्यामुळे त्यांची अपेक्षा असेल तसंचट तुम्हालाही बदलावं लागतं', असं साक्षी म्हणाली. 


भारतात क्रिकेटरशी लग्न करणं म्हणजे तुम्हाला एकांत आणि अशा अनेक गोष्टींशी तडजोड करावी लागते. सततचा कॅमेरा, माध्यमांच्या नजरा, कुठंही गेल्यास मागे येणारे माध्यमांचे प्रतिनिधी... या साऱ्याचा सामना आपण केल्याचं साक्षीनं सांगितलं. 



'तुम्हाला तुमचा असा एकांतातील वेळ मिळतच नाही. काही लोक कॅमेरासमोर सहजपणे वावरतात पण, काहींना ते शक्य होत नाही. विशेष म्हणजे तुम्ही जेव्हा लोकांमध्ये असता तेव्हा ते तुमच्याबद्दल पूर्वग्रह बांधणारच. 


हे तेव्हा जास्त होतं, जेव्हा तुम्ही एखाद्या खेळाडूची पत्नी असता. तुम्ही मित्रमंडळींसोबत फिरत असाल तरीही ते तुमच्याबद्दल बोलणार', असं साक्षी म्हणाली. 


खेळाडूची पत्नी म्हणून साक्षीला कायमच माहीची पाठराखण करताना, त्याला पावलोपावली साथ देताना पाहायला मिळालं आहे. 


4 जुलै 2010 ला तिनं महेंद्रसिंह धोनीची पत्नी म्हणून त्याच्या जीवनात प्रवेश केला. त्या क्षणापासून अनेक सामन्यांच्या वेळी तिनं आपल्या पतीला क्रिकेट मैदानातही साथ दिल्याचं पाहायला मिळालं आहे.