KL Rahul vs Australia: टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जोरदार इनिंग खेळली. या सामन्यात त्याने मोठ्या दिग्गजांना मागे टाकत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.  टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना मोहालीच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाला 200 हून अधिक धावा करुनही 4 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. संघाचा पराभव झाला असला तरी या सामन्यात फलंदाजांनी दमदार धावा केल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुलनेही संस्मरणीय खेळी खेळून चाहत्यांची मने जिंकली. (KL Rahul IND vs AUS 1st T20 Match) त्याने एक खास विक्रमही आपल्या नावावर केला जो मोठे दिग्गज फलंदाज करु शकले नाहीत. आशिया कप 2022 मध्ये सलामीवीर केएल राहुल खूप शांत होता. अनेक दिग्गज खेळाडूही त्याच्या खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते, मात्र या सामन्यात त्याने सर्वांना चोख उत्तर दिले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात केएल राहुलने स्फोटक खेळी केली. त्याने 35 चेंडूत 157.14 च्या स्ट्राईक रेटने 55 धावा केल्या. या स्फोटक खेळीत त्याच्या बॅटने 4 चौकार आणि 3 षटकारही मारले. 


हा विक्रम केला आपल्या नावावर  


केएल राहुलने त्याच्या या शानदार खेळीत T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 हजार धावा पूर्ण केल्या. केएल राहुलने 2016 मध्ये टीम इंडियासाठी पहिला टी-20 सामना खेळला आणि त्याने 2 हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी 58 डाव खेळले. यासह, तो T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा पूर्ण करणारा जगातील तिसरा फलंदाज बनला आहे. पाकिस्तानच्या बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी 52 तर विराट कोहलीने केएल राहुलपेक्षा 56 डावांमध्ये हा पराक्रम केला आहे.


केएल राहुल याची टी20 कारकीर्द 


केएल राहुल हा टी-20 फॉरमॅटमधील टीम इंडियाचा सर्वात यशस्वी फलंदाज आहे. केएल राहुलने टीम इंडियासाठी आतापर्यंत 62 टी-20 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 39.67 च्या सरासरीने आणि 141.32 च्या स्ट्राइक रेटने 2018 धावा केल्या आहेत. त्याने आपल्या टी-20 कारकिर्दीत आतापर्यंत 18 अर्धशतके आणि दोन शतके झळकावली आहेत. या सामन्यापूर्वी त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याची मागणी सातत्याने होत होती, मात्र त्याने या खेळीने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.