Corona in Cricket : यावर्षी जून महिन्यात होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी सर्वच संघ जोरदार तयारी करत आहेत. भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान (Ind vs AFG) तीन सामन्यांची टी0 मालिका खेळवली जाते. तर तिकडे न्यूझीलंड आणि पाकिस्तानदरम्यान (Pak vs NZ) पाच सामन्यांची टी20 मालिका रंगतेय. पण या मालिकेपूर्वी धोक्याची घंटी वाजलीय. या मालिकेत कोरोनाची (Corona) एन्ट्री झाली आहे. शुक्रवारी रंगलेल्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला. न्यूझीलंडचा स्टार ऑलराऊंडर मिचेल सँटनर या मालिकेतून बाहेर पडलाय. सामन्यापूर्वी मिचेल सँटनरची (Mitchell Santner) कोरोना चाचणी करण्यात आली. यात तो पॉझिटिव्ह आढळला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना कमी झाल्याच्या मोठ्या काळानंतर एखाद्या क्रिकेटपटूला कोरोना झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. पण याचा सामन्यावर कोणताही परिणाम झाला नाही. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मिचेल सँटनरला पूर्णपणे विश्रांती घेण्याचा आणि घरात राहाण्याचा सल्ला दिला आहे. पाकिस्तान-न्यूझीलंड पहिला टी20 सामना नियोजित वेळेत खेळवण्यात आला.


पाकिस्तान-न्यूझीलंडची विश्वचषक तयारी
न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघाने या मालिकेच्यानिमित्ताने टी20 विश्वचषक स्पर्धेची तयारी सुरु केली आहे. पाकिस्तान टी20 संघाचा कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीसाठी ही पहिली परीक्षा असणार आहे. टी20 विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाची बांधणी करण्याच्या दृष्टीने शाहीन शाह आफ्रिदीचा प्रयत्न असेल. पाकिस्तान टी20 संघाची सुरुवात बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान करणार नाही याचे संकेतही आफ्रिदीने दिले आहेत. टी20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तानला 17 सामने खेळायचे आहेत. यात वेगवेगळे प्रयोग केले जातील असं कर्णधार आफ्रिदीने स्पष्ट केलं आहे. 


पाकिस्तानचा दारूण पराभव
न्यूझीलंड आणि पाकिस्तानदरम्यान पहिला टी20 शुक्रवारी खेळवण्यात आला. यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 46 धावांना दारूण पराभव केला. पहिली फलंदाजी करताना न्यूझीलंडने 8 विकेट गमावत 226 धावा केल्या. डेरेल मिचेलने तुफान फटकेबाजी करत पाकिस्तान गोलंदाजांची पिसं काढली. मिचेलने अवघ्या 27 चेंडूत चार चौकर आणि चार षटकार मारत 61 धावा केल्या. तर केन विल्यमन्सने 57 धावा करत त्याला चांगली साथ दिली. तर सलामीच्या फिन अॅलनने 34 धावा केल्या. पाकिस्तानतर्फे शाहिन आफ्रिदी आणि अब्बास आफ्रिदीने प्रत्येकी तीन विके घेतल्या. 


विजयासाठी 227 धावांचं आव्हान समोर ठेऊन खेळणाऱ्या पाकिस्तानचा डाव 180 धावात आटोपला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या बाबर आझमने 57 धावा करत विजयासाठी झुंज दिली. पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. टीम साऊदीने चार विकेट घेत पाकिस्तानचं कंबरड मोडलं.