एशिया कपदरम्यान पाकिस्तानाला मोठा धक्का, `या` क्रिकेटरला 12 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
एशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचा सामना सुरु असतानाच एक मोठी बातमी समोर आली. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला तब्बल 12 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या शिक्षेमुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे.
Pakistan Cricket : एशिया कप 2023 स्पर्धेत सुपर-4 चे सामने सुरु आहेत. पाकिस्तान यंदाच्या एशिया कप स्पर्धेचा (Asia Cup 2023) आयोजक देश आहे. एकीकडे एशिया कप स्पर्धेची धूम असताना दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट क्षेत्रात खळबळ उडवणारी एक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या एका माजी दिग्गज क्रिकेटपटूला तब्बल 12 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामुळे पाकिस्तान क्रिकेटला मोठा धक्का बसला आहे.
नेदरलँडच्या एका कोर्टाने (Dutch Court) पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू खालिद लतीफला (Khalid Latif) 12 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. नेदरलँडमधले एक नेते ग्रीट विल्डर्स यांची हत्या करण्यासाठी भडकवल्याचा आरोप खालिद लतीफवर आहे. याप्रकरणी आता त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. लतीफचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात डच सांसद गीर्ट विल्डर्स यांचं शिर कापून आणणाऱ्याला 21,000 यूरो देण्याची घोषणा लतीफने केली होती.
विल्डर्स यांनी 2018 मध्ये मोहम्मद पैंगबर यांच्यासंबंधित एक कार्टून स्पर्धा आयोजित करण्याची योजना आखली होती. पण याविरोधात प्रचंड जनक्षोभ उसळला आणि आंदोलनं झाली. तसंच विल्डर्स यांना जीवे मारण्याची धमकीही मिळाली. त्यामुळे विल्डर्स यांनी ही स्पर्धा रद्द केली. विल्डरस यांनी स्पर्धेची घोषणा केल्यानंतर त्यांच्याविरोधात सोशल मीडियावरही रोष व्यक्त करण्यात येत होता. यातच खालिद लतीफने विल्डर्स यांचं शिर कापणाऱ्याला इनाम घोषित केलं. डच सासंद गीर्ट विल्डर्स हे इस्लामविरोधी वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात.
खालिद लतीफ हा सध्या पाकिस्तानात आहे. नेदरलँडच्या कोर्टात सुनावणी सुरु असताना लतिफ हा पाकिस्तानात होता. लतिफच्या गैरहजेरीत नेदरलँड कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. लतीफ ही शिक्षा पूर्ण करेल याची शक्यता फारच कमी आहे.
लतिफची वादग्रस्त कारकिर्द
खालिद लतिफने पाकि्सतानसाठी 5 एकदिवसीय आणि 13 टी20 सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये लतीपने 147 धाव केल्या आहेत, यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. तर टी20 क्रिकेटमघ्ये त्याच्या नावावर 237 धावा जमा आहेत. लतिफ पाकिस्तानसाठी 2016 मध्ये शेवटचा सामना खेळला होता. 2010 च्या एशियाई क्रीडा स्पर्धेत लतिफने पाकिस्तान क्रिकेट संघाचं नेतृत्वही केलं. लतिफची क्रिकेट कारकिर्द वादग्रस्त राहिली आहे. 2017 मध्ये स्पॉच फिक्सिंगमध्ये दोषी आढळल्यानंतर लतीफवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली. त्याचबरोबर एक लाख पाकिस्तानी रुपयांचा आर्थिक दंडही ठोठावण्यात आला.