रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास, इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये `अनोखं शतक`
Ind vs Eng : भारत आणि इंग्लंडदरम्यान रांचीत चौथा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा दिग्गज अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनने इतिहास रचला आहे. इंग्लंडविरुद्ध त्याच्या नावावर शतकाची नोंद झाली आहे.
IND vs ENG 4th Test: भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना खेळवला जात आहे. इंग्लंडने टॉस जिंकून पहिली फलंदाजी (India vs England Test) करण्याचा निर्णय घेतला. या सान्यात टीम इंडियाचा (Team India) दिग्गज अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने (R Ashwin) इतिहास रचला आहे. आर अश्विनने इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये अनोख्या शतकाची नोंद केली आहे. आर अश्विनने इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 100 विकेटचा टप्पा पूर्ण केला आहे.
आर अश्विनने रचला इतिहास
आर अश्विनने इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये शतक ठोकत इतिहास रचला आहे. इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. अश्विनच्या आधी इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिव विकेट घेण्याचा विक्रम भारताचे दिग्गज लेग स्पिनर भागवत चंद्रशेखर यांच्या नावावर होता. चंद्रशेखर यांनी इंग्लंडविरुद्ध 23 कसोटी सामन्यात 27.27 च्या अॅव्हरेजने तब्बल 95 विकेट घेतल्या होत्या. 107 धावात 9 विकेट ही चंद्रशेखर यांची इंग्लंडविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी होती. (R Ashwin complete 100 Test wickets against England)
इंग्लंडविरुद्ध 1000 धावा आणि 100 विकेट
आर अश्विनने आता चंद्रशेखर यांचा विक्रम मागे टाकला आहे. इतकंच नाही तर इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावा आणि 100 विकेट घेणारा तो एशियातला पहिला खेळाडू बनला आहे. आर अश्विनने इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 1085 धावा केल्या आहेत. अश्विनने इंग्लंडविरुद्ध अवघ्या 23 कसोटी सामन्यात 100 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. अश्विनने भारतासाठी 99 आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात आतापर्यंत 502 विकेट घेतल्या आहेत. यात त्याने तब्बल 34 वेळा पाच विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. तर 8 वेळा 10 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत.
अनिल कुंबळेची इंग्लंडविरुद्ध कामगिरी
भारताचा माजी दिग्गज लेद स्पिनर अनिल कुंबळेने इंग्लंडविरुद्ध 19 कसोटी क्रिकेट सामन्यात 30.59 च्या अॅव्हरेजने 92 विकेट घेतल्या आहेत. अनिल कुंबळेने भारतासाठी 132 कसोटी सामन्यात तब्बल 619 विकेट घेतल्या आहेत. यात त्याने 35 वेळा पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेण्याची कामगिरी केलीय. तर 8 वेळा 10 किंवा त्यापेक्षा विकेट घेतल्या आहेत. बिशन सिंह बेदी यांनी इंग्लंडविरुद्ध 22 कसोटी सामन्यात 85 विकेट घेतल्या आहेत. बेदी यांनी भारतासाठी 67 सामन्यात 266 विकेट घेतल्या आहेत. तर 14 वेळा पाच विकेट घेण्याची आणि 1 वेळा 10 विकेट घेतल्या आहेत.